कोल्हापूर : विकासाला पुढे घेऊन जाणारा शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे, अशा घोषणा देत जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात समूहाने आले. सातबारा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रकल्प होण्याची मागणी केली. तर, या प्रकल्पाच्या आडवे कोण आले तर त्यास आडवा करण्याची तयारी असल्याचा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला.
राज्य शासनाने नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग साकारण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून विरोध होत असताना प्रकल्प समर्थक शेतकऱ्यांनी सातबारा घेऊनच जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार राजेश क्षीरसागर यांचे फलक आणि सातबारा घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना भेटले.
शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात आमदार क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शक्तिपीठ महामार्ग समर्थन समितीचे पदाधिकारी, समर्थक शेतकरी यांची येडगे यांच्या दालनात बैठक झाली. पदाधिकारी, शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील ८० टक्के शेतकऱ्यांचे महामार्गाला समर्थन असल्याचा दावा केला. विकास होण्यासाठी जमिनी देणार असून, जास्तीत जास्त दर दिल्यास विरोधातील शेतकरी समर्थन करतील, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, समर्थक शेतकरी समितीचे अध्यक्ष प्रा. दौलतराव जाधव, माजी महापौर राजू शिंगाडे, नवनाथ पाटील, आनंदा धनगर , भीमराव कोतकर, सचिन लंबे, सतीश मानगावे, वासंती हराळे, रुक्मिणी माने, नीता पाटील, सविता माने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.