संपूर्ण महिनाभर पाऊस न झाल्याने बुलढाणा जिल्ह्य़ातील शेतकरी व शेती व्यवस्था प्रचंड अडचणीत सापडली आहे. खरीपाची पेरणी के व्हा होणार, याची आस शेतकऱ्यांना लागली असून तो पावसाची आभाळाकडे डोळे लावून चातकासारखी प्रतीक्षा करीत आहे.
जिल्ह्य़ात पाऊस अवर्षणामुळे धरणे, सिंचन प्रकल्प, जलाशयातील पाणी पातळी झपाटय़ाने कमी होऊ लागली आहे. विहिरी, विंधन विहिरी, कूपनलिका या जलस्त्रोतांची पातळी कमी झाल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्य़ात विक्रमी १३० टक्के पाऊस पडला होता. जिल्ह्य़ातील ३ मोठे, ७ मध्यम व ७४ लघुप्रकल्प संपूर्णपणे भरले होते. महिन्याभरापासून पावसाची दडी असल्याने जिल्ह्य़ातील मोठी व मध्यम धरणे अजूनही थोडीफार तग धरून आहेत. नळगंगा धरणात ५ जुलैला ३१.१६ टक्के, पेनटाकळीमध्ये २८.४३, तर खडकपूर्णा धरणात ५२.०१ टक्के जलसाठा उपलब्ध होता. मध्यमपैकी ज्ञानगंगा ४०.९१ टक्के , मस २६.४०, कोराडी ४७.२२, पलढग १९.९७, मन १९.२२, तोरणा १३.४३, उतावळी १९.२० टक्के असा जलसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्य़ातील ७४ लघु प्रकल्पातील जलसाठय़ात झपाटय़ाने घट होत आहे. आज तब्बल १९ लघुप्रकल्प कोरडे पडले असून यात बुलढाणा तालुक्यातील शेकापूर, पांग्री केसापूर, झरी, दहिद, मातला, बोधेगाव, चिखली तालुक्यातील अंचरवाडी-१, कटवडा, देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा, खामगाव तालुक्यातील कळपविहिर, चोरपांग्रा, आंभारा, बोरखेडी संत, मेहकर तालुक्यातील चायगांव, मोताळा तालुक्यातील वारी-१, नांदुरा तालुक्यातील लोणवडी, तर सिंदखेड राजा तालुक्यातील मांडवा, पिंपरखेडा, विद्रुपा या प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय, मिसाळवाडी, अंचरवाडी-२ मेढगांव, पिंपळगाव चिलम, शिवणी अरमाळ, तांबोळासारखे दहा प्रकल्प शेवटच्या घटका मोजत आहेत. पावसाअभावी जिल्ह्य़ातील सात लाख हेक्टरवरील खरीपाची पेरणी संपूर्णपणे खोळंबली आहे. धुळपेरणी केलेल्या, तसेच पावसाळापूर्व लागवड केलेल्या सुमारे ३५ हजार हेक्टरवरील पिकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. पावसाअभावी संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jul 2014 रोजी प्रकाशित
पावसाअभावी जलसाठे तळाशी, शेतकरी त्रस्त
संपूर्ण महिनाभर पाऊस न झाल्याने बुलढाणा जिल्ह्य़ातील शेतकरी व शेती व्यवस्था प्रचंड अडचणीत सापडली आहे. खरीपाची पेरणी के व्हा होणार, याची आस शेतकऱ्यांना लागली असून तो पावसाची आभाळाकडे डोळे लावून चातकासारखी प्रतीक्षा करीत आहे.

First published on: 09-07-2014 at 09:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers get irritated due to insufficient rain in nagpur