संगमनेर : निळवंडे धरण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील रखडलेली वितरिकांची कामे आणि कालव्याशेजारील रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी आज, शुक्रवारी आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. ‘जलसंपदा’च्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, येत्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

संगमनेर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, दत्ता कोकणे, विष्णुपंत रहाटळ, सचिन दिघे, मारुती कवडे, सुमित पानसरे, रमेश नेहे, सनी ठोंबरे, अक्षय दिघे, संतोष नागरे, आनंद वर्पे, निर्मला राऊत, संतोष हासे, सुहास आहेर, किरण रोहम, प्रदीप हासे, प्रमोद पावसे, गोरख सोनवणे, हर्षल राहणे, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार तांबे म्हणाले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. वितरिकांच्या कामासाठी मागील सरकारच्या काळात पाठपुरावा करून एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला होता. आजपर्यंत वितरिकांसाठी १५० कोटी रुपये खर्च झाले. मात्र, संगमनेरमध्ये ही कामे सुरूही झाली नाहीत. कामे कुठे सुरू आहेत याची माहिती मिळत नाही. निळवंडेच्या पाण्यावर सर्वांचा हक्क आहे, त्यामुळे पाणीवाटप करताना संगमनेरला न्याय मिळाला पाहिजे. कालव्या लगतच्या रस्त्यांची दुरुस्ती, त्यावरील काँक्रीट व लोखंडी पुलांचे काम वेळेत पूर्ण करावे. पुलांवर पाणी साठत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

पाणीगळती थांबवा, कालवे फुटू नये यासाठी खबरदारी घ्या. मोठ्या ओढ्या-नाल्यांमध्ये ‘ओव्हरफ्लो’ चे पाणी जाण्यासाठी जादा ‘एस्केप’ ची व्यवस्था करा. ‘स्कॉडा’ योजनेबाबत सर्व शेतकऱ्यांना सविस्तर माहिती द्या. किती शेतकरी लाभार्थी ठरतील आणि किती सिंचनाखाली येईल, याची क्षेत्र निश्चिती तातडीने करावी. पाणीपट्टी वसुलीसाठी सक्ती करू नये. पाण्याचे योग्य नियोजन होईपर्यंत ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी न भरण्याचे ठराव करावेत, आदी मागण्यांवर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रदीप हासे व अमोल कवडे यांनी येत्या पंधरा दिवसांत कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आमदार तांबे यांनी दिला.

आमचा जन्मच आंदोलनातून

संघर्ष आणि आंदोलन आम्हाला नवीन नाही. आमचा जन्मच आंदोलनातून झाला आहे. आम्ही नागरिकांच्या हक्कासाठी कायम लढलो आहोत. अगदी दिल्लीपर्यंत आमच्यावर खटले सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोन्ही जलसंपदा मंत्र्यांशी बोलणार आहे. कामांची अंमलबजावणी आजपासूनच सुरू करा, अशी मागणी करणार असल्याचेही तांबे यांनी सांगितले.