कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात २० दक्षता व भरारी पथके स्थापन करण्यात आले आहेत. १५ तालुक्यात सोयाबीन नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले असून बियाण्यांची गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभाग सदैव तत्पर असून बोगस बियाणे अथवा खताच्या काळाबाजाराची माहिती मिळाल्यास थेट कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी केले.
शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी कामाला लागला आहे. बियाणे व खतांची टंचाई जाणवू नये म्हणून जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख व त्यांचे पथक लक्ष ठेवून आहे. शेतीचा हंगाम सुरू होताच आंध्रप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम महाराष्ट्र, तसेच विदर्भातील काही स्थानिक ब्रॅन्ड बोगस बियाणे व खतांचा पुरवठा करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. गेल्या दोन वर्षांचा हा अनुभव लक्षात घेत यंदाही तसे होऊ नये म्हणून जिल्ह्यात २० दक्षता व भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात प्रत्येकी एक भरारी पथक, चार उपविभागात चार व जिल्हास्तरावर एक, असे २० भरारी पथके राहतील. प्रत्येक कृषी केंद्राला भेट देऊन तेथील बियाणे व खतांचा साठा तपासण्यासह कुठे काळाबाजार तर होत नाही ना, यावरही ते लक्ष ठेवून आहेत. बहुतांश कृषी व्यापारी बियाणे व खतांची साठवणूक करून टंचाई निर्माण करतात आणि नंतर जास्त दराने बियाण्यांची विक्री करतात. याला आळा घालण्यासाठी ही भरारी पथके कृषी केंद्रातील बियाणे व खताच्या साठय़ाची नियमित तपासणी केली जात असल्याची माहिती देशमुख यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
यावर्षी प्रथमच १५ तालुक्यात सोयाबीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे स्वत: जवळचे बियाणे पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. प्रत्येक बियाण्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेली आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे बियाणे मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झालेले आहे. त्यामुळे उगवण क्षमताही शेतकऱ्यांनी तपासून घ्यावी, अशीही सूचना करण्यात आलेली आहे. यंदा धान व कापसाचे लागवड क्षेत्र वाढले आहे. कापसाचे ६ लाख ८ हजार पॉकीट या जिल्ह्यासाठी मंजूर झाले असून त्यातील ४ लाख ७९ हजार बी.टी. कापसाचे पाकीट प्राप्त झाले आहे. यातील २ लाख ५ हजार बी.टी. कापसाच्या पाकिटांची विक्री झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना काळ्या बाजाराचा फटका बसू नये म्हणून दक्षता पथकाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वसामान्यांनाही बियाणे, खताच्या काळ्याबाजाराची माहिती मिळत असेल किंवा एखादा कृषी केंद्र संचालक बियाण्यांची साठवणूक करत असेल तर तात्काळ तक्रार नोंदवावी. अशा कृषी केंद्र संचालकांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. भरारी पथकाला रोजचा अहवाल कृषी विभागाकडे सादर करायचा आहे.

शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
विदर्भात १९ व २० जून रोजी मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खाल्याने वर्तविला आहे. सलग ४८ तास होणाऱ्या या पावसाचे संकेत हवामान खात्याच्या संकेतस्थळावर आहेत. त्यामुळे विदर्भातील ११ जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या दोन दिवसात सतर्क राहण्यासंदर्भात आवाहन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार येथे जिल्हा कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे संदेश दिले जात आहेत.