राहाता : माहेरी गेलेल्या पत्नीने सासरी परत येण्यास नकार दिल्याने, तिला घ्यायला निघालेल्या पतीने आपल्या चार अल्पवयीन मुलांना विहिरीत ढकलून देत स्वत:ही विहिरीत उडी मारत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारातील शिर्डी बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या साठवण तलावाजवळ शनिवारी उघडकीस आली.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी या संदर्भात माहिती दिली. अरुण सुनील काळे (वय ३०, रा. चिखली, कारेगाव ता. श्रीगोंदा, अहिल्यानगर), शिवानी अरुण काळे (वय ८), प्रेम अरुण काळे (वय ७), वीर अरुण काळे (वय ६) आणि कबीर अरुण काळे (वय ४) अशी मृतांची नावे आहेत.

कोऱ्हाळे शिवारातील भाऊसाहेब धोंडिबा कोळगे यांच्या शेतातील गट नंबर २६९ मधील विहिरीमध्ये शनिवारी दोन मृतदेह तरंगताना आढळल्याचे केलवडचे पोलीस पाटील सुरेश गमे यांनी राहाता पोलिसांना कळवले. पोलिसांसह शिर्डी व राहाता येथील नगरपरिषदेचे आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने पाण्यात उतरून मदतकार्य अशक्य होते. अखेर गळ सोडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि एकापाठोपाठ एक मृतदेह बाहेर काढण्यात आले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अरुण काळे हा त्रास देत असल्याने त्याची पत्नी त्याच्यासोबत राहात नव्हती. अरुणने मुलांना सोबत घेत पत्नीला आणण्यासाठी येवला येथील सासुरवाडीला तो निघाला होता. यावेळी त्याने वाटेतच पत्नीला दूरध्वनी करत तू नांदायला ये, नाहीतर मुलांना मारून टाकत आत्महत्या करेल, अशी धमकी दिली. तिने नकार देताच त्याने रागाच्या भरात वाटेतच राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारातील शिर्डी बाह्यवळण रस्त्यालगत एका विहिरीमध्ये मुलांना ढकलून देऊन आत्महत्या केली. त्यापैकी अरुण सुनील काळे, शिवानी काळे, वीर काळे यांचे मृतदेह दुपारी विहिरीच्या बाहेर काढण्यात तर दोन मुलांचे मृतदेह रात्री उशिरापर्यंत बाहेर काढण्यात आले.

काळे याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. घटनास्थळापासून काही अंतरावर त्याची दुचाकी आढळली. याबाबत रात्री उशिरा राहाता पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.