नांदेड : मुदत संपून तीन वर्ष झालेल्या नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेला सुद्धा आता सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागले आहेत. मंगळवारी (दि. १४) सायंकाळनंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार लगोलग समाज माध्यमांवर सक्रिय झाले. उमेदवारांचे नवनवे चेहरे समोर येत असून, दिवाळीत शुभेच्छा फलकांपासून प्रचाराला सुरुवात होईल. दरम्यान, जानेवारीमध्ये प्रत्यक्ष निवडणुका होण्याची शक्यता असून, युती व आघाडीबाबत चर्चांना उधाण आले आहे. या निवडणुकीत खासदार अशोकराव चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या. राज्यातील बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती केव्हाच संपल्या आहेत. काही नगरपालिका व नगरपंचायती तेवढ्या कार्यरत आहेत. बहुतांश ठिकाणी प्रशासक राज सुरू आहे. नांदेड महापालिकेची यापूर्वीची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्यावेळी खासदार अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये होते. ही महापालिका काँग्रेसकडून हिसकावून घेण्यासाठी तत्कालीन भाजपा नेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राणा भीमदेवी आवेश दाखविला होता. त्यांना तेव्हाचे आणि आताचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठबळ दिले होते.
दरम्यान, या महापालिकेची मुदत २०२२ मध्ये संपली ; परंतु मागील सात-आठ वर्षांत पुलाखालून व वरून बरेच पाणी वाहून गेले. त्यावेळेसचे काँग्रेस नेते आज भाजपा नेते झाले आहेत. तेव्हा त्यांनी तत्कालीन सुद्धा सत्ताधारी भाजपाला पाणी पाजत प्रचंड बहुमत मिळवत महापालिका काँग्रेसकडे खेचून आणली होती. आता त्यांना याच महापालिकेसाठी भाजपातर्फे मतदान मागावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या या ‘यू टर्न’ला नांदेडकर किती प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दरम्यान, नांदेड महापालिकेसाठी मंगळवारी अंतिम प्रभागरचना जाहीर झाली असून, एकूण प्रभागांची संख्या वीस आहे. तर सदस्य ८१ निवडून द्यावयाचे आहेत. २० पैकी १९ प्रभागांतून प्रत्येकी चार तर एका प्रभागातून पाच सदस्य निवडून येतील. या प्रभागरचनेचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हवाई सर्वेक्षणाची मदत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.