सातारा : वाई पालिकेच्या सुलतानपूर येथील कचरा डेपोला मध्यरात्री मोठी आग लागली. यामुळे कचरा डेपोलगत असलेल्या औद्योगिक वसाहत सुलतानपूर परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. आगीचे मोठे लोळ दूरवरून दिसत होते. आग विझविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पालिकांचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. दुपारपर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. या आगीत मोठ्या प्रमाणात सुका कचरा जळून गेला.

वाई पालिकेचा सुलतानपूर येथे कचरा डेपो आहे. शहरातील व आजूबाजूच्या ग्रामपंचायती आणि औद्योगिक वसाहतींतील कचरा येथे टाकण्यात येतो. या कचरा डेपोला मध्यरात्री मोठी आग लागली. ही आग एवढी भयानक होती, की त्यामुळे परिसरातील औद्योगिक वसाहत, सुलतानपूर ग्रामपंचायत आणि लगतच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. कचरा डेपोलगत असलेल्या वाई औद्योगिक वसाहत आणि सुलतानपूर ग्रामपंचायत परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. धुराचे लोट हवेत दूरवरून दिसत होते. आग विझवण्यासाठी वाई, सातारा, पाचगणी, महाबळेश्वर, कराड, किसनवीर कारखाना येथील बंब अविरत काम करत होते. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. सकाळी सात वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, दुपारपर्यंत ती धुमसत होती. दुपारपर्यंत धूर निघत होता. धूर दिसणाऱ्या जागेवर पाण्याची फवारणी करण्याचे काम सुरू होते. वेळीच आग आटोक्यात आणण्यात पालिका प्रशासनाला अपयश आल्याने परिसरातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. कचरा डेपोवर पालिकेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी, आरोग्य अधिकारी विजय मारोडा आणि सर्व कर्मचारी व विभागप्रमुख उपस्थित होते. ही आग लागली, की अज्ञाताकडून लावण्यात आली, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. आगीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.