दापोली : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये लासा कंपनीचा कारखाना आगीच्या भक्षस्थानी पडला होता. तर दुसऱ्या बाजूला ॲक्विला ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात रिऍक्टरचा स्फोट होऊन दोन कामगार गंभीररित्या होरपळले. हा स्फोट रविवारी दुपारी पावणेतीन वाजता झाला.

प्रदूषण, वायूगळती, सांडपाणी उघड्यावर सोडणे आणि वारंवार होणाऱ्या दुर्घटना यामुळे लोटे औद्योगिक वसाहत ही कायमच चर्चेत राहिलेली आहे. रविवारी लासा या कारखान्याला भीषण आग लागली होती. औद्योगिक वसाहतीच्या आगीचे बंब ती आग विझवण्यामध्ये व्यस्त होते. संपूर्ण औद्योगिक वसाहत तसेच पंचक्रोशीतील नागरिक हे त्या ठिकाणी जमले असतानाच पावणेतीन वाजता महामार्गाच्या पश्चिमेकडील ॲक्विला ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात रिऍक्टरचा स्फोट झाला आणि दोन कामगार गंभीररीत्या भाजले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र या कारखान्यात रुग्णवाहिका नसल्यामुळे जखमी कामगारांना उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यासाठी दुचाकीचा वापर करण्यात आला. ज्या कामगारांच्या जीवावर आपली आस्थापना चालते अशा कामगारांच्या बाबतीत एवढी उदासीनता पाहून पंचक्रोशीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अद्यापही कोणतीही नोंद करण्यात आलेली नसल्याने आग व स्फोटा बाबत अधिक माहिती प्राप्त होऊ शकली नाही.