निवडणूक म्हणजे ‘लगीन’घाईच! कमी वेळेत अधिक कामे उरकायची. रुसवेफुगवे, मानापमान, आदरातिथ्य, आहे-नाही, आला-गेला या सर्वच बाबींकडे बारकाईने लक्ष. लोकसभेच्या मैदानात मागील वेळी जयवंत आवळेंच्या ‘लग्ना’ची जबाबदारी विलासराव देशमुखांची असली, तरी ते काही अगदीच ‘हात’ वर करून आले नव्हते! आर्थिकदृष्टय़ा सक्षम असल्यामुळे देशमुखांवर सर्वच भार नव्हता. या वेळी मात्र राहुल गांधींच्या फॉम्र्युल्यानुसार लोकांतून उमेदवार म्हणून निवडले गेलेल्या जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे गुरूजी यांना पक्षाने संधी दिली. मात्र, बनसोडे सेवानिवृत्त शिक्षक. पेन्शनशिवाय अधिकची मिळकत नाही. पण निवडणुकीचे तुम्ही टेन्शन घेऊ नका, असे त्यांना सांगितले असल्यामुळे, ‘दोन हस्तक अन् तिसरे मस्तक’ या सूत्रानुसार त्यांचा प्रचार सुरू झाला आहे.
गुरुजींच्या पालकत्वाची जबाबदारी देशमुख कुटुंबीयांवर येऊन ठेपली असल्यामुळे निवडणुकीचे संपूर्ण टेन्शन स्वाभाविकपणे देशमुख कुटुंबीयांवर आहे. गेल्या ६ महिन्यांपासून माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर व अशोक चव्हाण, अहमदपूरचे विनायकराव पाटील, उदगीरचे बसवराज पाटील नागराळकर, राजेश्वर निटुरे, चंद्रशेखर भोसले या सर्व मंडळींसह राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांची मोट बांधण्यात आमदार अमित देशमुखांना खस्ता खाव्या लागल्या.
प्रचार शुभारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच पहिल्यांदा लातुरात आणले असल्यामुळे आपले हात कुठपर्यंत आहेत, याचा अंदाज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना यावा याचीही काळजी घेतली गेली. एखाद्या क्रिकेट सामन्यात समोरचा संघ कसा का असेना, सुरुवातीपासून सामना खेचायचा या जिद्दीने संघातील खेळाडूंनी खेळ करायचा असतो, हे लक्षात घेऊन काँग्रेसचा जिल्हय़ातील प्रचार आक्रमकपणे सुरू आहे.
महायुतीत मात्र उमेदवार ठरविण्यासाठीच ‘नमनाला घडाभर’ अशी स्थिती झाली. उमेदवार निश्चितीसाठी भाजपने प्रचंड वेळ घेतला. पूर्वीच निर्णय घेतला असता तर तयारीला वेळ तरी मिळाला असता, अशी कार्यकर्त्यांत भावना आहे. भाजपने लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून प्रदेश सरचिटणीस संभाजी पाटील निलंगेकर यांना जबाबदारी दिली. पक्षाने जबाबदारी दिली असल्यामुळे त्यांना रात्रीचा दिवस करून काम करावे लागत आहे. माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, भाऊ अरिवद यांच्यासह त्यांची पत्नीही प्रचारात आहेत. वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशामुळे आता सगळे जण कामाला लागले आहेत.
कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांची संख्या मोठी असून नेत्यांना सांभाळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. महायुतीचे उमेदवार सुनील गायकवाड दुसऱ्यांदा िरगणात आहेत. त्यांना निवडणुकीचा अनुभव आहे. भाजपतील गट-तट, कार्यकर्त्यांची क्षमता, सेनेची ताकद, तसेच रिपाइं, स्वाभिमानी संघटना या सर्वाना सोबत घेऊन जाण्यात दमछाक होत आहे. ‘रात्र थोडी अन् सोंगे फार’ अशी स्थिती आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांची प्रचारफेरी सुरू झाली. मात्र, अजून पुरेशा संख्येने जाहीर सभांचे नियोजन झाले नाही. पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेवर सारी भिस्त आहे.
‘मुंजी’चीही तयारी!
आगामी विधानसभा निवडणुकीतही सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच वातावरण राहणार असल्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील विधानसभेचे इच्छुक लोकसभा निवडणुकीच्या ‘लग्ना’त आपल्या ‘मुंजी’ची तयारी करून घेत आहेत. लग्न समारंभात भावकीला सांभाळावे लागते. घरचेच लग्न असले, तरी भावकीची काळजी अधिक घ्यावी लागते. थोडी कुठे चूक झाली, तर लगेच ते नेमके चुकीवर बोट दाखवणार. खिशात हात फक्त रुमाल काढण्यापुरताच, हे लक्षात ठेवून आखणी केली जात आहे.