मुंबई : राज्यात करोनाची साथ आटोक्यात आल्याने राज्यात पहिली ते चौथीच्या प्राथमिक शाळाही लवकरच सुरू करण्याबाबत वैद्यकीय कृती गटाने मान्यता दिल्याने त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिले.

राज्यात पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करुन अनेक निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. लहान मुलांसाठी लसीकरण सुरु केले जाणार असून १२ ते १८ वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. पण पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याचा प्रश्न आहे. लहान मुलांचे लसीकरण होईपर्यंत त्यांना करोना होण्याची भीती आहे. पण मुलांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी असून पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही. वैद्यकीय कृती गटाने काही अटी व नियम घालून आणि काटेकोर उपाययोजना करुन प्राथमिक शाळा सुरू करण्यास संमती दिली आहे. गेले दीड वर्षे शाळा बंद असल्याने त्या सुरू करण्यासाठी पालकांचाही दबाव आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने निर्णय होईल, असे टोपे यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील नाटय़ व चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून परिस्थिती सुधारल्यावर निर्बंध आणखी शिथील होतील. पण लग्नसराई आणि बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी असून सामाजिक अंतराचे नियम पाळले जात नाहीत. हे अयोग्य असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे टोपे यांनी स्पष्ट केले. ज्या नागरिकांना लसीच्या मात्रा देऊन वर्ष होत आले, त्यांना वर्धक मात्रा देण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.