मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून जागेची पाहणी; ‘सिंधू स्वाध्याय’ उपक्रमांतर्गत नवनवीन अभ्यासक्रम
महाराष्ट्राला ७२० किलोमीटरची सागरी किनारपट्टी लाभली आहे. किनारपट्टीवर नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे बारमाही मत्स्यव्यवसाय करता यावा याकरिता जलविज्ञान केंद्र उभारून अभ्यासक्रम सुरू करण्याचा मनोदय मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी पालघर येथे व्यक्त केला.
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राची पालघर येथे तातडीने उभारणी व्हावी याकरिता जागेच्या उपलब्धता आणि काही ठिकाणांची पाहणी करण्यासाठी त्यांनी गुरुवारी दौरा केला.
मुंबई विद्यापीठाचा विस्तार झपाटय़ाने झाला असून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी मुंबई येथे येण्याची गरज भासू नये म्हणून पालघर येथे विद्यापीठ उपकेंद्र उभारण्याचा निर्णय पूर्वी झाला होता. या प्रशासकीय उपकेंद्रासाठी आवश्यक असलेल्या सुमारे पाच एकर जागा तसेच येथील आदिवासी विद्यार्थी किनारपट्टीवरील विद्यार्थी ‘सिंधू स्वाध्याय’ या उपक्रमांतर्गत यांना नवनवीन अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळण्यासाठी सुमारे शंभर एकर क्षेत्रांमध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. या उपकेंद्रासाठी जिल्हाधिकारी तसेच खासदार यांची भेट घेऊन शासनाने प्रस्तावित केलेल्या काही जागांची पाहणी कुलगुरू आणि मुंबई विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालघरमध्ये केली.
आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरावेत असे अभ्यासक्रम सुरू करण्याचा मुंबई विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचे सांगत मच्छीमारांची नवीन पिढी घडवण्यासाठी नवीन अभ्यासक्रम आणि जलविज्ञान केंद्र उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
मत्स्यव्यवसायाला प्राधान्य
* अशाच पद्धतीचे केंद्र रत्नागिरी आणि वेंगुर्ले येथे उभारण्यात येणार आहेत. पालघर येथील जलविज्ञान केंद्राच्या उभारणीसंदर्भात कुलगुरूंनी सातपाटी येथील दोन्ही सहकारी मच्छीमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रस्तावाला मच्छीमार बांधव, जिल्हाधिकारी आणि खासदार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अभ्यासक्रम तातडीने सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.
* भारतात पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते. चार महिन्यांच्या काळात मासेमारी बंद करणे भाग असते. जगभरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून १२ महिने मत्स्यव्यवसाय केला जातो. त्या दृष्टीने तंत्रज्ञान व विज्ञान शिकवणारे नवनवीन अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मच्छीमारांच्या कुटुंबीयांना तसेच होतकरू तरुणांना मत्स्य व्यवसायातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली जाईल.
* विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या प्रशासकीय भवनासाठी तसेच सिंधू स्वाध्याय अंतर्गत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पालघर शहराजवळ व शक्य झाल्यास नवनगर मुख्यालय वसाहतीमध्ये पाच एकरचा भूखंड मुंबई विद्यापीठाला देण्यात यावा, ही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १०० एकर क्षेत्रफळाच्या काही जागांची पाहणी विद्यापीठाविषयी कुलगुरू यांनी केली.