अलिबाग : रायगड जिल्‍हयात लंपीस्‍कीन आजाराने शिरकाव केला असून कर्जत तालुक्‍यातील 5 जनावरांना या रोगाची बाधा झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले आहे. ही जनावरे घाटमाथ्‍यावरून विकत आणली होती. त्‍यांच्‍यामुळे अन्‍य जनावरांना बाधा झाली नसल्‍याचे जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ. आर. बी. काळे यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

कर्जत तालुक्‍यातील खांडस, पिंपळोली व वावे या गावांतील 5 बैलांमध्‍ये लंपीस्‍कीन आजाराची लक्षणे दिसत होती. या संशयित जनावरांच्‍या रक्‍ताचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्‍यात आले होते. त्‍याचा अहवाल पॉझि‍टिव्‍ह आला आहे. दरम्‍यानच्‍या काळात या पाचही जनावरांचे विलगीकरण करण्‍यात आले होते. तसेच या जनावरांचा वावर असलेल्‍या परीसरात फवारणी करण्‍यात आली आहे.

हेही वाचा : “संभाजीनगरकरांच्या उरावर आधुनिक ‘सजा’कार..”, राज ठाकरेंचं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त खुलं पत्र!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बाधीत जनावरांमुळे अन्‍य जनावरांना बाधा झालेली नाही. जिल्‍हयात अन्‍यत्र कुठेही लंपीस्‍कीनचा प्रादुर्भाव झालेला आढळून आलेला नाही. दरम्‍यान लंपीस्‍कीनचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासन तसेच पशुसंवर्धन विभागाकडून योग्‍य ती खबरदारी घेण्‍यात येत आहे. जिल्‍हयात या आजाराला प्रतिबंध करणारया 10 हजार लशींचा साठा उपलब्‍ध करून देण्‍यात आला आहे. दरम्‍यान पशुपालकांनी घाबरून न जाता सावधानता बाळगावी असे आवाहन डॉ. आर. बी. काळे यांनी केले आहे.