वन्य प्राण्यांची शिकार म्हणजे फक्त वाघाची शिकार आणि त्याच्या अवयवांची तस्करी असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र इतर छोटे प्राणी उदाहरणार्थ रानडुक्कर, खवल्या मांजर, साळिंदर हे देखील अनेकदा  निशाण्यावर असतात. शुक्रवारी सातारा वन विभागाच्या भरारी पथकाने मौजे धावडशी  जि.सातारा येथे संशयावरुन दोन घरांची झडती तपासणी केली असता दोन्ही घरात रानडुकराचे तुकडे करुन ठेवलेले कच्चे मासं आढळले.

या बाबत वनविभागाने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी शिकार केल्याच्या संशयावरून आकाश अरुण पवार (वय 20 वर्षे), शशिकांत प्रकाश पवार (वय 24 वर्षे), प्रकाश शरद अनपट (वय 19 वर्षे), मंगेश नारायण पवार (वय 29 वर्षे) सर्व रा.धावडशी ता.जि.सातारा, सोमनाथ बाळासो घारगे (वय 29 वर्षे) रा.आकले ता.जि.सातारा यांना ताब्यात घेवून अटक केली. सदर गुन्हयात वापरण्यात आलेली मोटर सायकल क्रमांक एम.एच.1/ए.यू.8922, व इतर साहित्य असे जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

सदरची कारवाई सागर गवते ,विभागीय वनअधिकारी (दक्षता) कोल्न्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली  सचिन डोंबाळे वनपरिक्षेत्र अधिकारी, संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन सातारा, व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 वे कलम 39 नुसार वन्यप्राणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. मात्र मांसाच्या लोभापायी लोकांकडून रानडुक्कर, ससे, भेकर, साळींदर, सांबर या वन्यप्राण्यांची शिकार करण्याची अपप्रवृत्ती वाढत आहे, अशी माहिती वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. नागरिकांकडून बऱ्याचदा अज्ञानातून देखील अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत.

सह्याद्रीच्या जंगलामध्ये व आसपासच्या परिसरात सुद्धा अशाप्रकारे तृणभक्षक प्राण्यांची शिकार केल्याच्या घटना घडत असल्याचे सांगितले जाते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना वाइल्डलाइफ सेंच यांनी बनलेला आहे. या जंगलांमध्ये व विशेषतः कोयनेच्या जंगलात, भक्ष्याचे, म्हणजेच या तृणभक्षक प्राण्यांचे प्रमाण पुरेसे नसल्यामुळे या विस्तीर्ण अशा व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघ स्थायिक होत नाहीत. त्यामुळे या जंगलामध्ये वाघोबाची डरकाळी ऐकायची असेल, तर या प्राण्यांची केली जाणारी बेकायदेशीर शिकार रोखायला हवी हे वेगळे सांगायला नको!

वारंवार लागणा-या वनवनव्यामुळे वन्यप्राण्यांचे डोंगरातील खादय संपुष्टात येत आहे.त्यामुळे वन्यप्राणी शेतपीकाकडे वळण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.त्यामुळे नागरीकांनी आपआपल्या गावातील जंगलक्षेत्राला वणव्यापासून संरक्षण देणेही आवश्यक आहे.