वडकी येथे भीषण अपघातात पाच ठार

मृत व जखमी राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील रहिवासी आहेत. 

(संग्रहित छायाचित्र)

यवतमाळ : हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे वाढदिवस व भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणारा ऑटो व भरधाव कारमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार तर १५ जण जखमी झाले. अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोघेजण उपचारादरम्यान दगावले. आज दुपारी नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वडकी (ता. राळेगाव) येथील उडाणपुलानजीक हा अपघात झाला. मृत व जखमी राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील रहिवासी आहेत.  अरविंद तात्या बोरूले (३५), संगीता अरविंद बोरूले (३२) या दाम्पत्यासह उमा गुलाबराव शेंडे (५५), जया लोनबले (३०), येनूबाई शेषराव जुमनाके (६०) सर्व रा. रिधोरा अशी मृतांची  तर लक्ष्मी विजय गुरुनुले (२९),  विद्या प्रकाश वडतकर (४०), सरला कांशीराम तोडासे (४०), वेदिका बोरूले (१८), समीर उईके (१५), नंदा शेंडे (४०), धनश्री तोडासे (१०), कांताबाई बोरूले (४०), साधना शेंडे (२३), मयंक शेंडे (८), नंदनी सोनवणे (१०), भाग्यश्री शेंडे (२३) सर्व रा. रिधोरा अशी जखमींची नावे आहेत. अपघातातील जखमींना तत्काळ राळेगाव व वडनेर येथे नेण्यात आले. तेथून यवतमाळ, वर्धा येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले. भरधाव कारमधील विशाल अशोक पराते (३७), रा. नागपूर, प्रेरणा सारंग पराते (३०), शान्वी पराते (सहा महिने) हे तिघे जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले. जखमींमध्ये काहींची प्रकृती गंभीर आहे. या भीषण अपघातात ऑटोचे दोन तुकडे झालेत. जखमींना मदत करत असताना झालेल्या धावपळीत पोलीस कर्मचारी सूरज चिव्हाणे यांचा पाय मोडल्याचे सांगण्यात येते.

निवडणूक कर्तव्यावरून परतताना एक ठार

निवडणूक कर्तव्यावरून परतताना झालेल्या अपघातात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री नागपूर-तुळजापूर महामार्गावरील कोसदनी (ता. आर्णी) घाटात घडली. विकास गुटे (४२) रा. घाटंजी असे मृत कर्मचाऱ्याचे तर गणेश तंबाखे (४२), कल्याण बेदरकर (४३), कृष्णा भागवत (४४) सर्व रा. घाटंजी अशी गंभीर जखमींची नावे झालेत. हे सर्व कर्मचारी घाटंजी येथील कृषी विभागात कार्यरत होते. त्यांची पुसद येथे निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Five killed in horrific accident in wadki