परभणी : गोदावरी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्यानंतर आज गोदाकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती उद्भवली. विशेषतः गंगाखेड शहर व परिसरात पाण्याचा वेढा पडला असून हजारो हेक्टर जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. पाथरी, मानवत, सोनपेठ तालुक्यांमध्ये गोदाकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले होते. मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात करण्यात आली होती. बुधवारी सकाळी गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आज पाणी उतरायला सुरुवात झाली असली तरी पूरस्थिती कायम आहे.
गोदावरी नदीवरील धारखेड येथे पुलावरून पाणी आले त्यानंतर या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला. गोदाकाठच्या काही गावांमध्ये पाणी शिरल्याने त्या ठिकाणच्या नागरिकांना अन्यत्र स्थलांतरित करावे लागले. गोदावरी नदीच्या बॅक वॉटरमुळे गावात पाणी घुसल्याने धारासुर येथील काही नागरिकांना तुळशीराम पाटील विद्यालयात हलवले आहे.गंगाखेड तालुक्यातील चिंचटाकळी, खळी, मैराळ सांगवी, सायाळ गौडगाव, जवळा या गावांचा संपर्क तुटला असून सायाळा, सुनेगाव या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे. धारासुर येथील ६० कुटुंबातल्या २०० व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आले असून गंगाखेड शहरातल्या बरकतनगर भागात गोदावरीचे पाणी घुसले आहे.
गोदावरी नदीला पूर आल्याने दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचा प्रवाह छोट्या-मोठ्या नद्यांच्या, ओढ्याच्या पाण्याला शिरू देत नाही परिणामी गोदावरीसह अन्य नद्यांचे, प्रवाहाचे पाणी शिवारभर पसरत चालले आहे. पूरस्थितीमुळे शेकडो एकर जमिनी पाण्याखाली आहेत. पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे ते देऊळगाव दुधाटे रस्ता परिसरात गोदावरी नदीच्या पाण्याचा तुंब आल्याने नदीकाठील शेतांना तळ्याचे स्वरूपात आले आहे. तसेच पुराच्या पाणापातळीत वाढ झाल्यामुळे तालुक्यातील मुंबर, गोळेगाव, देऊळगाव दुधाटे गावांचा संपर्क तुटला आहे.
मानवत तालुक्यातील वझुर बु, थार व वझुर खु. येथे आलेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करून आमदार राजेश विटेकर यांनी नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, आदींसह महसूल कर्मचारी उपस्थित होते. गोदाकाठच्या शिवारातील शेतांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतात अक्षरशः तळे साचले आहे. खरीप हंगामाची पूर्णपणे माती झाली असून हातातोंडाशी येणारा घास नष्ट झाला आहे. शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा आणखी काही दिवस होणार नाही. शेतातून नदीसारखे पाणी वाहू लागले आहे. खरीप हंगामाचे काहीच शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. उलट मशागत, लागवड, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा खर्च मात्र डोक्यावर कर्जाच्या रूपाने झाला आहे.