सोलापूर : बार्शी-सोलापूर मार्गावर आगळगाव येथील चांदणी तलावाला आलेल्या पुराचा तडाखा आसपासच्या सहा गावांना बसला असून त्यांचा संपर्क तुटला आहे. या भागात जे-जा करणाऱ्या एसटी बस ठप्प झाल्यामुळे प्रवाशांसह, विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले.

आगळगावसह कळंबवाडी, भानसोळी, उमरगे आदी गावांना या पुरामुळे एकमेकांचा संपर्क तुटला आहे. बार्शीजवळील परांडा (जि. धाराशिव) येथे मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. चांदणी नदीला तेथील पुलावर पाणी आल्यामुळे तेथील वाहतूक बंद झाली आहे.

इकडे दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तूर येथे सीना नदीच्या काठावर असलेली बिळेणी बनसिद्ध हिरकूर यांची दीड एकर उसाची शेती संपूर्ण मातीसह वाहून गेली आहे. सीना नदीच्या काठी असलेल्या या शेतीचे नुकसान झाल्याचे काही वाटत नाही, परंतु शेतातील माती वाहून गेल्याने फार मोठे नुकसान होते, अशी प्रतिक्रिया शेतकरी बिळेणी हरकूल यांनी व्यक्त केली आहे. सीना नदीच्या पुढे आणखी काही अंतरावर हीच परिस्थिती दिसून येते.