सावंतवाडी : सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावात मगर दिसल्याने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या मगरीला पकडण्यासाठी सापळा लावला होता, पण त्यात ती अडकली नाही. त्यामुळे रविवारी दुपारी ती पुन्हा एकदा संगीत कारंज्याजवळ दिसली.

​काही दिवसांपूर्वी मोती तलावात मगर असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या जलद कृती दलाने बोटीच्या मदतीने तपासणी केली होती. मात्र, त्यावेळी त्यांना मगरीचे अस्तित्व आढळले नव्हते. त्यानंतर वनविभागाने मगरीला पकडण्यासाठी एक सापळा लावला. नागरिकांना वाटले होते की ही मगर त्यात अडकेल, पण वनविभागाला त्यात यश आले नाही.

​आज, रविवारी अधुनमधून हीच मगर पुन्हा संगीत कारंज्याजवळ दिसल्याने सगळ्यांना आश्चर्य वाटले आहे. गणेशोत्सव तोंडावर आल्याने आणि याच ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन होत असल्याने, नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. कोणत्याही नागरिकाला धोका पोहोचू नये म्हणून वनविभागाने तातडीने या मगरीला पकडून तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.