राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री तेलंगणात जाऊन प्रचार करत आहेत. त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्र डागलं आहे. राज्यात सरकार आहे की नाही असा प्रश्न पडला असल्याचं ते म्हणाले. आज त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत सरकारच्या कारभारावर टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार आहे. पण हे सरकार तरी आहे की नाही असा प्रश्न पडला आहे. मुंबई-पुण्यात आजपर्यंत कधीही नव्हतं एवढं प्रदुषण अनुभवलंय. याबाबत काही तज्ज्ञांशी मी बोललो, त्यांचं असं म्हणणं होतं की नियोजनशुन्य विकासकामांमुळे प्रदुषण वाढलंय. त्यामुळे सगळीकडे धुळधाण झाली होती. प्रदुषण पाहिल्यानंतर आपल्या असंवैधानिक सरकारने जाहीर केलं होतं की मुंबईतील रस्ते धुवू आणि कृत्रिम पाऊस पाडू. यांच्याकडे सगळं कृत्रिमच आहे. पण तो कृत्रिम पाऊस पाडता आला नाही. सुदैवाने मुंबईत पाऊस पडला आणि प्रदुषण कमी झालं असावं.
तेलंगणात जाऊन कोणत्या भाषेत बोलणार?
“परंतु, त्याचवेळेला मुंबई व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात १ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं. उत्तर महाराष्ट्रात गारपिटीमुळे अनेक पिकांचं नुकसान झालंय. कांद्याचं नुकसान झालं. केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांदा शेतकरी रडकुंडीला आला होता. आता कांदाच गेला. मीसुद्धा अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो. काही गोष्टी मुख्यमंत्र्यांना बसल्या जागी येतात. त्यांनी राज्यातील परिस्थितीबाबत माहिती मागवली पाहिजे. आज जे मुख्यमंत्री स्वतःचं घर सोडून दुसऱ्याचं घर धुंडाळतात. तेलंगणात जाऊन ते कोणत्या भाषेत बोलणार? सुरत गुवाहाटीचा चोरटेप्रकार त्या लोकांना सांगणार आहेत का? असा संतप्त सवालही त्यांनी विचारला.
या राज्याचा मायबाप कोण?
“हे भुरटे राज्याला न्याय देऊ शकत नाहीत. दुसरे दोन हाल्फ कुठे आहेत माहित नाहीत. मग शेवटी या राज्याचा मायबाय कोण आहे? विशेष म्हणजे साधारणता काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने इशारा दिला होता की या काळात अवकाळी पाऊस होऊ शकतो. त्याबाबत आपल्या मंत्र्यांनी काय केलं? आपल्या कृषीमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की दिवाळीपूर्वी पीकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर मी दिवाळी साजरी करणार नाही. मला तर नंतर ते दिसले नाहीत. दिवाळीत फटाक्यांचा आवाज ऐकू आला पण मुंडेंचा आवाज ऐकू आला नाही. पण शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळाली का? मिळाली असेल तर कितीजणांना मिळाली? जी काही माहिती येत आहे त्यानुसार, काहींना २० रुपयांचा चेक मिळाला. ही तर शेतकऱ्यांची थट्टा झाली”, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
मुख्यमंत्र्यांची पंचतारांकित शेती
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, टीका केली की हे लोक लगेच गळे काढतात की गरीब शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला. पण यांची पंचताराांकित शेती आहे. ते तिथे हेलिकॉप्टरने पोहोचतात. अशी पंचतारांकित शेती राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या वाट्याला येऊदेत. पण आपला गरीब बिचारा शेतकरी त्याची पायवाट तुडवत शेतीत जातो. शेतकऱ्याच्या पुत्राला शेतकऱ्याची चिंता का वाटत नाही? असाही सवाल त्यांनी विचारला.
स्वतः विश्वगुरू असताना तुमची गरज काय?
“इतर राज्यात जाऊन तुम्ही म्हणता की रामलल्लाचं दर्शन मोफत देणार. पण तु्मचं दर्शन महाराष्ट्राला कधी होणार? महाराष्ट्राने काय पाप केलंय? निवडणुका आल्यावर तिजोरीची दारे उघडतील. पण सध्याच्या परिस्थितीची जबाबदी घेणार की नाही? आपले पंतप्रधान क्रिकेटच्या फायनलमध्ये जातात पण मणिपूरला जात नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दमदाट्या करायला वेळ आहे, इतर राज्यात रेवडी उडवायला वेळ आहे. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीवर कधी हात फिरवणार? ६ लोकांचे जीव आणि १०० हून अधिकांचा प्राण्यांची हानी झाली आहे. मुख्यमंत्री स्वतःचं घर सोडून दुसऱ्या राज्यात आहेत. स्वतः विश्वगुरु तिथे आल्यानंतर तुम्ही काय दिवे लावणार आहात? असा मिश्किल प्रश्नही त्यांनी विचारला.
“इतर राज्यातील थापा थांबवा. महाराष्ट्रात आज निवडणुका नाहीयत, पण आम्ही वाट पाहतोय. तुम्ही लवकरात लवकर तुमचं ट्रिपल इंजिन वगैरे किती इंजिने लावायची ते पाहा. पण त्या इंजिनातून थांपाचे धूर न सोडता भरघोस मदत करा. ताबडतोब आजच्या आज कॅबिनेटची बैठक घेऊन मदतीची घोषणा न करता मदत करायला सुरुवात करा. मधल्या काळात पीकविमा कंपन्यांविरोधात शिवसेनेने आंदोलन केलं. ही परिस्थिती सुधारली नाही तर मी दुष्काळग्रस्तांना दिलासा द्यायला जाईन, असं आश्वासन ठाकरेंनी दिलं.
आम्ही विधिमंडळात प्रश्न मांडतो, पण सरकार ढिम्म राहतं. हे सरकार बदलण्याची वेळ आली आहे. जिथं जिथं शेतीचं नुकसान झालंय त्यांना दिलासा द्या, जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारा, त्यांना काय आदेश आलेत ते पाहा, असं आवाहनही ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं आहे.