कराड : माजी मंत्री श्याम ऊर्फ जनार्दन बाळकृष्ण आष्टेकर यांचे आज बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता पुणे येथे राहत्या घरी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. पुण्याचे बालेवाडी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल आणि कराडलगतची तासवडे औद्योगिक वसाहत साकारण्यात श्याम आष्टेकर यांचा मोलाचा वाटा होता. अगदी उमेदीच्या काळात ते स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय झाले होते.
श्यामराव आष्टेकर हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. राजकारणात सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत ते पवारांच्या सोबत राहिले. कराडचे तब्बल ४३ वर्षे नगराध्यक्ष राहिलेल्या माजी आमदार पी. डी. पाटील या प्रभावी नेतृत्वाचा आष्टेकर यांनी सन १९८५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शरद पवारांच्या ताकदीच्या बळावर पराभव करून इतिहास रचला होता. ‘कराड उत्तर’मधून सलग दोनदा ते विधानसभेवर मताधिक्याने निवडून गेले. सुरुवातीपासूनच त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यांनी क्रीडा, उद्योग, सांस्कृतिक कार्य आदी खात्याचे मंत्री, सातारा व उस्मानाबादचे पालकमंत्री म्हणून कामगिरी बजावली. आपल्या १० वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकिर्दनंतर ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त झाले. मात्र, त्यांच्या या भूमिकेचे गूढ अखेरपर्यंत कायम राहिले.
कराड पालिकेचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, भारतीय ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे ते दीर्घकाळ पदाधिकारी राहिले. असंख्य होतकरू आणि गुणवान खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.