माजी आमदार तथा जि.प.चे माजी अध्यक्ष उत्तमराव विटेकर (वय ७१) यांचे अल्प आजाराने अंबाजोगाई येथील खासगी दवाखान्यात शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर विटा गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. विटेकर यांच्या पश्चात जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर व श्रीकांत ही दोन मुले, चार विवाहित मुली असा परिवार आहे.विटेकर हे सोनपेठ व गंगाखेड परिसरात भाऊ या नावाने ओळखले जात. १९४३ मध्ये विटा गावी त्यांचा जन्म झाला. विटा गावच्या सरपंचपदापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. १९७७ मध्ये ते सिंगणापूर मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. शरद पवार यांच्यासोबत ते समाजवादी काँग्रेसमध्ये होते. १९८५ मध्ये त्यांनी एस. काँग्रेस सोडून विधानसभा लढविली. त्यानंतर पोटनिवडणूक व १९९५ मध्ये अपक्ष म्हणूनही विधानसभा निवडणूक लढविली. १९७२ ते १९७८ दरम्यान गंगाखेड पंचायत समितीचे सभापती, १९७२ मध्ये शेळगाव सर्कलमधून जिल्हा परिषदेवर निवड, १९८० ते १९८२ गंगाखेड बाजार समितीचे सभापती, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, बालाघाट सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाचे संचालक आदी पदांवर त्यांनी कार्य केले. १९९६ मध्ये ते परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. निष्कलंक राजकारणी, स्पष्टवक्तेपणा, नि:स्वार्थी वृत्ती ही त्यांची स्वभाववैशिष्टय़े. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अंबाजोगाई येथे खासगी दवाखान्यात उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्यविधीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, व्यापारी, नागरिक, शेतकरी, कामगार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.