Ranjitsinh Nimbalkar’s Reaction On Allegations Of Suicide Of Female Doctor: फलटणच्या शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टर तरुणीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी या डॉक्टरने तिच्या हातावर आत्महत्येचे कारण लिहिले होते. यानंतर आज शिवसेनेचे (उद्धव) नेते अंबादास दानवे यांनी या डॉक्टर तरुणीवर माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी दबाव आणल्याचा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देताना फलटणमधील एका कार्यक्रमात बोलताना रणजीतसिंह निंबाळकर भावूक झाले.आपले भाषण संपवल्यानंतर ते डोळे पुसत खुर्चीवर बसल्याचे पाहायला मिळाले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
फलटणच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर होत असलेल्या आरोपांवर बोलताना माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले की, “दोन दिवसांपूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला. त्या भगिनीने हातावर मृत्यूचे कारण लिहून ठेवले आहे. तुम्ही (देवेंद्र फडणवीस) येऊ नये म्हणून गलिच्छ राजकारण झाले. मलाही दोन मुली आहेत. अशा घाणेरड्या प्रसंगाशी जेव्हा नाव जोडले जाते तेव्हा मनाला वेदना होतात.”
काय आहे प्रकरण?
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली होती. या मृत डॉक्टर तरुणीच्या तळहातावर तिच्या आत्महत्येमागील कारण लिहून ठेवलेले आढळले आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हे दोन्ही आरोपी पोलिसांना शरण आले आहेत.
दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या उपनिरिक्षकास निलंबित करण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अर्जुन काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या संबंधित डॉक्टर तरुणीने येथील एका हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री उशिरा आत्महत्या केली होती.
हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला होता. या मृत डॉक्टर तरुणीच्या तळहातावर तिच्या आत्महत्येमागील कारण लिहून ठेवलेले आढळले आहे. त्यामध्ये फलटण येथेच कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षक आणि आणखी एका व्यक्तीमुळे आत्महत्या करत असल्याचे या मृत डॉक्टरने लिहिले होते.
दोन्ही आरोपी अटकेत
या आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि निलंबित उपनिरीक्षक गोपाळ बदाने याला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. त्यांने फलटण शहर पोलिसांसमोर रात्री आत्मसमर्पण केले. या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी ही माहिती दिली. यापूर्वी दुसरा संशयित प्रशांत बनकर याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती.
