सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय पाटील यांनी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा ८ ऑक्टोबर रोजी आयोजित केला आहे. आगामी निवडणुकीमध्ये कोणती भूमिका घ्यावी याबाबत ते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून, यानंतर ती आपली भूमिका ते स्पष्ट करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, रोहित पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. ते अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप असले, तरी राजकीय व्यासपीठावर येण्याचे त्यांनी गेल्या १० महिन्यांपासून टाळले आहे. त्यांनी भाजप प्रवेशासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाला भाजप उत्सुक नसल्याचे दिसत असतानाच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगली दौऱ्यामध्ये त्यांच्या भाजपप्रवेशाचे संकेत दिले होते.

दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती व तासगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये काय भूमिका घेतली जाणार याबाबत कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील हे भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता वर्तवली जात असली तरी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून प्रवेशाबाबत मौन पाळले जात असल्याने राजकीय भूमिका काय घेतली जाणार याची उत्सुकता आहे. २७ सप्टेंबर रोजी मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, पावसामुळे तो रद्द करण्यात आला होता.

तासगाव तालुक्यात माजी खासदार संजय काका पाटील यांचा राजकीय गट कार्यरत असून शहरातही हा गट कार्यरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांच्या गटांशी राजकीय संघर्ष आहे. मागील निवडणुकीत नगरपालिका माजी खासदार गटाच्या ताब्यात आली होती, तर पंचायत समितीमध्ये आमदार रोहित पाटील समर्थक गटाची सत्ता होती.बदलत्या राजकीय स्थितीत माजी खासदार काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत आमदार गटाने सत्ता मिळवली होती, मात्र नंतरच्या काळात माजी खासदार पाटील यांच्या गटाने नगराध्यक्ष पद मिळवत बाजी मारली होती.