साक्री तालुक्यातील राहुड येथील शासकीय आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापक, व्यवस्थापक व दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. चौथीतील सिद्धार्थ जगन्नाथ कचवे (१०), रा. वालवे आणि तिसरीतील मनोज पंडित चौरे (९), रा. मचमाळ या साक्री तालुक्यातील दोन्ही विद्यार्थ्यांचा सोमवारी विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह न उचलण्याची भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली होती. पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले. अखेर रात्री साडेबाराच्या सुमारास प्रकल्प अधिकारी अविनाश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ए. व्ही. शिंपी, अधीक्षक ए. यू. गावित, प्राथमिक शिक्षक बी. एम. वडाळ आणि ए. व्ही. पाटील या चौघांना निलंबित करण्याचा आदेश पाटील यांनी दिला. त्यानंतर दोन्ही विद्यार्थ्यांचे पार्थिव हलविण्यात आले. आश्रमशाळेत ६२२ विद्यार्थ्यांचा प्रवेश असून त्यातील ४८१ विद्यार्थी वास्तव्यास आहेत. ३१ कर्मचारी असलेल्या या आश्रमशाळेत घटनेच्या दिवशी केवळ कामाठीच उपस्थित होता. मुख्याध्यापक व व्यवस्थापक हे अनुपस्थित होते.