अवघ्या दीड महिन्यांपूर्वी गारपिटीने राज्याला झोडपले असतानाच शनिवारी राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने थैमान घातले. प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भाला याचा जास्त फटका बसला. अंगावर वीज कोसळून नऊ जण ठार झाले. तर अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले.
औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, परभणीसह मराठवाडय़ात ठिकठिकाणी शनिवारी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्य़ात वीज कोसळून महिला व लहान मुलीचा मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली. जालना जिल्ह्य़ातही शुक्रवारी उशिरा दोनजणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. कळंब तालुक्यातील बोरगाव (धनेश्वरी) येथे वीज कोसळून शेतात काम करणारी जिजाबाई तोरगडे (५०) ही महिला ठार झाली.
परांडा तालुक्यात पाऊस सुरू असताना राधा गिलबिले (११) ठार झाली, तर तिची आई रेखा गिलबिले (३२) गंभीर जखमी झाली. जिल्ह्य़ात बहुतांश ठिकाणी वादळासह पावसात पिकांचे मोठे नुकसान झाले.  वाशी, भूम, तुळजापूर तालुक्यांत ठिकठिकाणी वादळी पाऊस झाला. जालना जिल्ह्य़ात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. अर्जुन तांबे (१८, दुधपुरी, तालुका अंबड) व प्रकाश गोरख राऊत (२५, गवळी पोखरी, तालुका जालना) अशी या दोघांची नावे आहेत. बीड जिल्ह्य़ात शनिवारी संध्याकाळीही जोरदार पाऊस झाला. कर्जत तालुक्यातील राशिन येथील साळवे कॉलनीत शनिवारी लागेश व चंदुरा या मजुरांच्या अंगावर वीज पडून हे दोघे जागीच ठार झाले.
बुलढाण्यात तीन ठार
*लोणार तालुक्यातील जांभुळ येथील सुभाष महाजन (२५), सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरखेड येथील शेख रोशन (२५), साखरखेर्डा येथील संतोष चांगाडे यांचा समावेश आहे.
*अचानक वीज अंगावर कोसळल्याने विहिरीचे काम करणाऱ्या एका मजुराचा मृत्यू झाला, तर शेतमालकासह पाच जण जखमी झाले.
वाई तालुक्यात मुसळधार
वाई तालुक्याच्या पूर्वभागातील बोपेगाव, ओझर्डे, कवठे, पांडे, खानापूर आदी गावांमध्ये आज दुपारी जोरदार वाऱ्याने व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर वाई – वाठार रस्त्यावर पाच – सहा ठिकाणी लहानमोठी झाडे पडल्याने सुमारे दोन-तीन तास वाहतुकीची कोंडी झाली.
सिंधुदुर्गातही तुरळक सरी
जिल्ह्य़ातील आंबोली, चौकुळ भागात तसेच सह्य़ाद्रीच्या पट्टय़ात तासभर पावसाचा तुरळक शिडकाव झाला. ढगांचा गडगडाट करत कोसळलेल्या पावसामुळे विजेच्या लखलखाटाच्या प्रसंगी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Freak rain in marathwada vidarbha konkan killed
First published on: 20-04-2014 at 05:38 IST