लोकसत्ता वार्ताहर

कराड : ऑलिम्पिकवीर, ख्यातनाम मल्ल (कै.) खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर (ता. कराड) या जन्मगावी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकवीर पहिलवान खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारणीकरिता राज्य शासनाने अखेर २५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे अनेक अडचणींवर मात करत कराडलगतच्या गोळेश्वरमध्ये खाशाबांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १९५२ साली झालेल्या स्पर्धेत फ्री स्टाईल ५७ किलो वजनी गटातील कुस्ती जिंकून खाशाबा जाधव यांनी भारताला ऑलिम्पिकमधील वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले कांस्यपदक मिळवून देण्याचा इतिहास रचला. परंतु, आजवर खाशाबा जाधव यांचा यथोचित राष्ट्रीय सन्मान झाला नसल्याची सल कुस्तीप्रेमींमध्ये आहे. यासंदर्भात कुस्तीप्रेमींच्या शिष्टमंडळाने खाशाबांना ‘पद्मविभूषण’साठी केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांची अलीकडेच भेट घेतली होती. मोहोळ यांनी या मागणीला समर्थन देत पाठपुरावा करण्याचे आश्वासन कुस्तीप्रेमींना दिले होते. त्यामुळे खाशाबा जाधवांचा सन्मान आणि खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारणीसंदर्भात कुस्तीप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

आणखी वाचा-Deepak Kesarkar : “अशा प्रकरणांनंतर संपूर्ण सिस्टम बदलावी लागेल”, बदलापूर प्रकरणी दीपक केसरकरांचं महत्त्वाचं सुतोवाच; शाळांमध्ये पॅनिक बटण लावणार?

पहिलवान खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी गोळेश्वर (ता.कराड) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणीस ३० जुलै २००९ ला शासनाने मान्यता दिली आणि त्यासाठी गोळेश्वर ग्रामपंचायतीने कराड तालुका क्रीडा संकुल समितीकडे जागाही वर्ग केली होती. या जागेवर क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी संचालनालयाच्या ६ ऑगस्ट २०१४ च्या आदेशान्वये एक कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता. तोकडा निधी आणि या जागेसंदर्भात न्यायालयामध्ये तीन दावे सुरू होते. त्यापैकी शासनाविरोधात असलेले दोन दावे तक्रारदारांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली मागे घेतले आहेत.

पहिलवान खाशाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुलाच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता देऊन २५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे हे क्रीडा संकुल उभारणीची तब्बल एक तपाची प्रतीक्षा संपली आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी परिपूर्ण असे हे संकुल उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी दिली आहे.

आणखी वाचा-TISS Student Dead : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा विद्यार्थी पार्टीनंतर मृतावस्थेत आढळला; पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

या भव्य क्रीडा संकुलाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अॅडमिन एरिया, किचन व डायनिंग स्वच्छतागृह, जिम, व्हीआयपी रूम, टीएम ए व बी रूम, ऑडिओ व्हिज्युअल रूम, फील्ड ऑफ प्ले, मॅट, मुला-मुलींची डॉमेन्ट्री, टॉयलेट, ५०० लोकांची आसन व्यवस्था असलेली प्रेक्षक गॅलरी या सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

दरम्यान, दोन दिवसापूर्वीच क्रीडा संकुलाच्या जागेची मोजणीची प्रक्रिया पार पडली आहे. गोळेश्वर ग्रामपंचायतीने कुस्ती संकुलनासाठी ९५ गुंठे जागा देत ती जागा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या नावे केली. यापैकी सध्यस्थितीत ५८ गुंठे जागा कोठे आहे? हेच समजत नाही. तर, उर्वरित जागा शासनाच्या ताब्यात आहे. मागील वर्षी म्हणजे १४ ऑगस्ट २०२३ रोजी तत्कालीन क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी कराड तहसीलदार कार्यालयात या विषयावर बैठक घेवून क्रीडा संकुलाचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर, दोन दिवसांपूर्वी गोळेश्वरमध्ये जागा मोजणीची प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे आता तेथील ५८ गुंठे जागा लवकरच अतिक्रमण मुक्त होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खाशाबांचे पुत्र पहिलवान रणजीत जाधव म्हणाले, राज्य शासनाने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राला निधी मंजूर केला आहे. त्यामुळे हे काम दोन वर्षात पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे.