अहिल्यानगर: राज्य सरकारच्या परिस्थितीबद्दल आपल्याला माहिती नाही, मात्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) विकासासाठी जागतिक बँकेकडून १ हजार २०० कोटी व आशियाई विकास बँकेकडून ४ हजार ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज, गुरुवारी नगरमध्ये बोलताना दिली. याशिवाय प्रत्येक जिल्हा नियोजन समितीकडून एकूण ३०० कोटी अतिरिक्त मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा घेण्यासाठी मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ही माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी संस्थांच्या सल्लागार समितीचे सदस्य, उद्योजक तसेच संस्थातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून लवकरच रोबोटिक, ड्रोन, इलेक्ट्रिकल व्हेईकल, सौरऊर्जा तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता असे नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत तसेच अल्प मुदतीच्या प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम आयोजित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आयटीआयमध्ये जागा उपलब्ध न झाल्यास ‘जर्मन हँगर’ उभारून केंद्र चालवले जातील, यासाठी संस्थांनी पुढे यावे असेही आवाहन त्यांनी केले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते (महानगर), दिलीप भालसिंग (दक्षिण), नितीन दिनकर (उत्तर) माजी महापौर बाबासाहेब वाकळे, विनायक देशमुख आदी उपस्थित होते. राजेंद्र काळे, वैभव जोशी, नीलेश बाबर, राम वडागळे, गीता गिल्डा, बाबा सानप, शिवाजी खिलारी, अनंत देसाई आदींनी विविध प्रश्न उपस्थित केले. वाहतूक व्यवसायाच्या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करण्याची सूचना त्यांनी वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी सानप यांना केली.

माईकची पळवापळवी आणि मंत्र्यांची नाराजी

भाजप पक्षाच्या बैठकीत मंत्री लोढा यांनी कार्यकर्त्यांना आयटीआयच्या अडचणी संदर्भात विचारणा केली, त्यावेळी बोलण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये माईकची पळवापळवी झाली. त्यावरून मंत्री लोढा यांनी नाराजी व्यक्त केली. एका कार्यकर्त्याच्या हातातील माईक बंटी हापसे यांनी पळवून तो बाबा सानप यांना दिला. त्यावरून थोडा गोंधळ झाला. त्याबद्दल लोढा यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, भाजप यासाठी प्रसिद्ध नाही. कार्यकर्ता आमचा मालक असला तरी ही पद्धत योग्य नाही.

आयटीआयमध्ये खासगी संस्थांची भागीदारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या दोन वर्षात राज्यातील आयटीआयचे चित्र बदलून टाकण्याचा प्रयत्न आहे. नवे अभ्यासक्रम सुरू केले जातील, नवी यंत्रसामग्री आणली जाईल, खासगी संस्था, कंपन्यांच्या सहकार्यातून आयटीआयमध्ये बदल घडवण्यासाठी यंदाच्या वर्षात ५० संस्थांमधून प्रायोगिक तत्त्वावर ७० टक्के सरकारी निधी व ३० टक्के खासगी गुंतवणूक याप्रमाणे भागीदारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही मंत्री लोढा यांनी सांगितले.