हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीच्या वतीने भौगोलिक मानांकनासाठी (जीआय) रायगड जिल्ह्यातील पेण येथील गणेश मूर्तीचा प्रस्ताव चेन्नई येथील जीआय नोंदणी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे, लवकरच त्यास मान्यता मिळेल अशी अपेक्षा आहे.

ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीच्या वतीने भौगोलिक मानांकनासाठी चेन्नई येथील जीआय नोंदणी कार्यालयाकडे जीआय मानांकन मिळविण्यासाठी देशभरातील ३५ उत्पादनांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १३ उत्पादने महाराष्ट्रातील आहेत. यात पेण येथील गणेश मूर्तीचा समावेश आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण हे गणेश मूर्तीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पेण येथील गणेश मूर्ती सुबक असतात तसेच मूर्तीचे रंगकामदेखील चांगले असते. या मूर्ती आकर्षक असतात. त्यामुळे येथील गणेश मूर्तीना भारतात तसेच परदेशांतदेखील प्रचंड मागणी आहे. पेणमधून दरवर्षी लाखो गणेश मूर्ती परदेशात पाठविल्या जातात. यात करोडो रुपयांची उलाढाल होत असते. याचा गैरफायदा घेताला जात आहे. इतर ठिकाणी बनविलेल्या मूर्तीदखील पेण येथील गणेश मूर्ती असे सांगून विक्री करून गणेशभक्तांची फसवणूक केली जाते.

ही फसवणूक टाळण्यासाठी तसेच पेण येथील गणेश मूर्तीना वेगळी ओळख मिळून देण्यासाठी पेण येथील गणेश मूर्तीना जीआय मानांकन मिळवण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

पेण तालुक्यातील साडेपाचशे गणेश मूर्ती कारखान्यांमधून सुबक गणेश मूर्ती बनवण्याचे काम वर्षभर सुरू असते. दरवर्षी सुमारे ३२ लाख गणेश मूर्ती पेणमधून देशविदेशांत पाठवल्या जातात. यातून सुमारे ६० कोटींची उलाढाल होत असते. आकर्षक रंगसंगती आणि रेखीव मूर्तीमुळे या मूर्तीना जगभरातून मागणी होत असते.

पेण येथील गणेश मूर्तीना वेगळी ओळख मिळावी यासाठी त्यांचा जीआय मानांकन प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जीआय मिळावे यासाठी आमचा पाठपुरवा सुरू आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गु. श. हरळय्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड