सांगली : कार्यकर्त्यांचा उत्साह, झांज पथकाचा दणदणाट, लेझीम, बँझो पथकाच्या तालावर मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणूक रविवारी सायंकाळी पाच वाजता शेवटच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर समाप्त झाली. चालू वर्षी तब्बल ३१ तास विसर्जन मिरवणुक सुरू होती. गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण असले तरी काही किरकोळ वादाचे उद्भवलेले प्रसंग पोलिसांनी शिताफीने हाताळल्याने मिरवणूक शांततेत पार पडली.

मिरजेचे मध्यवर्ती बस स्थानक ते शहर पोलीस ठाणे, किसान चौक, लक्ष्मी मार्केट ते सराफ कट्टा मार्गे गणेश तलाव हा दोन किलोमीटरचा विसर्जन मिरवणूक मार्ग आहे. या विसर्जन मार्गावर मध्यरात्री एक वाजेपर्यंत दुतर्फा गणेश भक्तांची मोठी गर्दी होती. मिरजेतील सर्व गणरायाचे विसर्जन मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावात झाले. विसर्जनासाठी महापालिकेने क्रेनची व्यवस्था केली होती.

महापालिका कर्मचाऱ्यांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीस शनिवारी सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. दिवसभर विसर्जन मिरवणूक मार्गावर मंडळांच्या मिरवणुका फारशा रस्त्यावर आल्या नाहीत. मात्र, सायंकाळी सातनंतर बहुसंख्य मंडळांच्या मिरवणुका सुरू झाल्या. नयनरम्य विद्युत रोषणाई, सजवलेल्या ट्रॅक्टरवर आणि सोबत ध्वनिक्षेपकांच्या भिंती, ढोल-ताशांचा दणदणाट, बॅण्ड व लेझीम पथकाच्या निनादात मिरवणुका सुरू होत्या.

मिरज मार्केट परिसरात अनेक मंडळांकडून व राजकीय पक्षांकडून स्वागत कमानी, स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. हिंदू एकता आंदोलन, मराठा महासंघ, शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे), विश्वशांती, छत्रपती संभाजी महाराज तरुण मंडळ, मनसे आदींनी भव्य स्वागत कमानी उभा केल्या होत्या. तर महापालिका, भाजप, जनसुराज्य शक्ती पक्षाच्या समित कदम मित्र मंडळ, किशोर जामदार मित्र मंडळ यांनी स्वागत कक्ष उभारले होते. प्रत्येक ठिकाणी मंडळाच्या श्रींचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात येत होते.

विसर्जन मिरवणुकीमध्ये खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार इद्रिस नायकवडी, समित कदम मंडळाच्या स्वागतासाठी हजर होते. तसेच महापालिकेच्या स्वागत कक्षामध्येही अधिकारी उपस्थित होते. पोलीस दलाच्यावतीनेही स्वागत कक्ष उभारला होता. या कक्षामधून मिरवणूक मार्गस्थ करण्यासाठी आणि गणेशभक्तांना सूचना देण्यात येत होत्या. विसर्जन मार्गावर सामाजिक संस्थांच्यावतीने पाणी, तसेच भोजन व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रसंग उद्भवला होता. तर कमान वेस येथील मंडळाच्या मूर्तीस मार्ग देण्यावरूनही वाद निर्माण झाला होता. रात्री बारा वाजता ध्वनियंत्रणा बंद करण्याचे पोलिसांचे आदेश असतानाही एका मंडळाने बारानंतर गणेशाची आरती ध्वनिक्षेपकावर सुरू करण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वादाचे प्रसंग टाळले.

रात्री बारानंतर वाद्ये, ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद केली असली तरी आज सकाळी १५ हून अधिक मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक मार्गावरच होत्या. उंच, भव्य मूर्ती असल्याने विसर्जनासाठी बराच वेळ जात असल्याने मिरवणूक यावर्षी बराच वेळ रेंगाळली. धनगर गल्लीतील मंडळाच्या गणेशमूर्तीचे आज, रविवारी सायंकाळी विसर्जन करण्यात आले.

मिरजेत ३६ तास मिरवणूकमिरजेतील १८६ सार्वजनिक मंडळांचे गणेश विसर्जन सायंकाळी ५ वाजता पार पडल्यानंतर मिरज शहर पोलीस ठाण्याच्या श्रींची विसर्जन मिरवणूक ढोलताशांसह सजवलेल्या रथातून काढण्यात आली. मिरवणुकीत ध्वनीवर्धक भिंतीतून वाजत असलेल्या गीतांवर उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, निरीक्षक किरण रासकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला. रात्री ९ वाजता पोलीस ठाण्याच्या श्रींचे विसर्जन झाल्याने यावर्षी सलग ३६ तास मिरवणूक सुरू होती.