लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : मिरज बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेउन महिलांचे दागिने व पर्स लंपास करणार्या तीन महिलांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी गजाआड केले. या महिला सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात यापुर्वीही गुन्हे दाखल आहेत.
आणखी वाचा-लातूर-टेंभुर्णी महामार्ग लवकरच चारपदरी, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी काही महिला प्रयत्नशील असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा लावला असता मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या दक्षिण बाजूस तीन महिला संशयास्पद आढळल्या. महिला पोलीसांकरवी विठाबाई चौगुले (वय ५०, रा. आळते माळ), नगिना सागर चौगुले (वय ४० रा. गोसावी गी हातकणंगले) आणि सावित्री लोंढे (वय ५० रा. कागवाड) या तीन महिलांना ताब्यात घेउन झडती घेतली असता त्यांच्याकडे दीड लाख रूपयांचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५० हजाराची रोख रक्कम आढळली. या प्रकरणी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.