अलिबाग – मेरीटाईम बोर्डाने गेटवे ते मांडवा बोट सेवा 1 सप्‍टेंबरपासून सुरू करण्‍यास परवानगी दिली होती. मात्र याबाबत आता अनिश्चितता निर्माण झाली आहे. खराब हवामानामुळे समुद्रात लाटांची उंची कमी झालेली नाही, पाऊस देखील सुरू आहे. त्यामुळे हवामानाची स्थिती लक्षात घेवून फेरीबोट सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.त्‍यामुळे उद्या (सोमवार) 1 सप्‍टेंबरपासून ही सेवा सुरू होण्‍याची शक्‍यता धूसर आहे.

तीन महिन्‍यानंतर 1 सप्‍टेंबर पासून गेटवे- मांडवा जलवाहतुक सुरू करण्‍यासाठी सेवा देणारया कंपन्यांनीही आपली सज्जता पुर्ण केली असून हवामान शांत होण्याची ते वाट पहात आहेत. तितकीच प्रतिक्षा गौरी-गणपतीच्या सणासाठी अलिबाग-मुरुडकडे येणारे चाकरमानी करीत आहेत. त्यांचा हा सर्वात आवडीचा मार्ग असला तरी बिघडलेल्या हवामानामुळे त्यांचा प्रवास सुरु होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. दरवर्षी सप्टेंबरच्या १ तारखेला ही फेरीबोट सुरु होते. त्यामुळे गौरी-गणपतीचा प्रवास सुखरुप करता येतो. यंदा गणपती उत्सव लवकर आल्याने जलप्रवास करीत गौरी-गणपतीसाठी गावाकडे येणाऱ्यांची संधी हुकली आहे.

गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा हा सर्वात लोकप्रिय जलवाहतुक मार्ग आहे. या मार्गावर दररोज हजारो पर्यटक आणि स्थानिक नागरिक प्रवास करीत असतात. या सेवेवर अलिबाग, मुरुड तालुक्यातील पर्यटन व्यवसाय अवलंबून असल्याने फेरीबोट केव्हा सुरु होणार याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. मेरीटाईम बोर्डाने १ सप्टेंबरपासून या मार्गावरील फेरीबोट सुरु करण्यास अनुमती दिली आहे. त्यानुसार अजंठा, मालदार, पीएनपी या वाहतुक संस्थांनी आपल्या फेरीबोटी सज्ज ठेवल्या आहेत. मागील वर्षी घारापुरी बेटाकडे जाणाऱ्या एका प्रवासी बोटीला झालेल्या दुर्घटनेनंतर मेरीटाईम बोर्डाने प्रवासांच्या सुरक्षेसाठी काही कडक अटी घालून दिल्या आहेत. त्या अटींची पुर्तता आणि बोटींची दुरुस्ती करुनच यंदा फेरीबोटी चालवण्यास अनुमती देण्यात येते. सध्या खराब असलेल्या हवामानामुळे ही खबरदारी घेतली जात आहे.

१ सप्टेंबरपासून गेटवे ते मांडवा फेरीबोट सुरु करण्यास मेरीटाईम बोर्डाने अनुमती दिलेली आहे. या दरम्यान हवामान शांत होणे गरजेचे आहे. सध्याची स्थिती पाहता फेरीबोट सेवा सुरु करणे प्रवाशांसाठी धोक्याचे होऊ शकते. भरतीची स्थिती पाहिल्यानंतर समुद्र किती खवळलेला आहे हे समजू शकते. त्याचबरोबर समुद्रात वाऱ्यांचा वेग आणि पडणाऱ्या मुसळधार पावसाचा अंदाज घेऊनच फेरीबोट सुरु केली जाईल. – आशिष मानकर, बंदर निरिक्षक मांडवा