महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान पाच टप्प्यांत
नवी दिल्ली : देशात १८ व्या लोकसभेसाठी निवडणुकीची बहुप्रतीक्षित घोषणा निवडणूक आयोगाने अखेर शनिवारी केली. ९७.६ कोटी नोंदणीकृत मतदार १९ एप्रिल ते १ जून अशा ४४ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदानाचा हक्क बजावतील, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये १९ एप्रिल ते २० मे या कालावधीत ५ टप्प्यांमध्ये मतदान होईल. ४ जून रोजी मतमोजणी होईल.
निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य ठरणे, रोख्यांचा तपशील सादर झाल्यानंतर त्यातील संगती-विसंगतीची चिकित्सा, काही दिवसांपूर्वीच एका निवडणूक आयुक्ताचा तडकाफडकी राजीनामा अशा पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शनिवारी केलेली घोषणा उत्सुकता ताणणारी ठरली होती. ‘मोदी की गॅरंटी’ विरुद्ध काँग्रेसचा ‘न्याय’ या आश्वासनांपैकी मतदाराची पसंती कोणाला मिळते, यावर ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’चे भवितव्य अवलंबून राहील.
राहुल गांधी यांची आज शिवाजी पार्कवर सभा; सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंची उपस्थिती
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विज्ञान भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी नवनियुक्त आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंह संधू हेही उपस्थित होते.
किती टप्प्यांत किती राज्ये?
’ एका टप्प्यात : अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, चंडीगड, दादरा-नगर हवेली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुदुच्चेरी, सिक्कीम, तमिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड.
* दोन टप्प्यांत: कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर.
* तीन टप्प्यांत: छत्तीसगड, आसाम.
* चार टप्प्यात: ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड.
* पाच टप्प्यात: महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर
* सात टप्प्यांत: उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल
महाराष्ट्र : पाच टप्प्यांत मतदान
* टप्पा १ : १९ एप्रिल : रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर.
* टप्पा २ : २६ एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, िहगोली, नांदेड, परभणी.
* टप्पा ३ : ७ मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.
* टप्पा ४ : १३ मे : नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरूर, शिर्डी, बीड, छत्रपती संभाजीनगर,
* टप्पा ५ : २० मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सर्वच्या सर्व सहा मतदारसंघ.
राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम
’अधिसूचना : २० मार्च, २८ मार्च,
१२ एप्रिल, १८ एप्रिल, २६ एप्रिल
’अर्ज भरण्याची अंतिम तारीख : २७ मार्च, ४ एप्रिल, १९ एप्रिल, २५ एप्रिल, ३ मे
’अर्जाची छाननी : २८ मार्च, ५ एप्रिल,
२० एप्रिल, २६ एप्रिल, ४ मे
’अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख :
३० मार्च ८ एप्रिल २२ एप्रिल २९ एप्रिल ६ मे
आचारसंहिता लागू
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यामुळे शनिवारपासून देशभर आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या राजकीय पक्ष वा नेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिला. लोकशाहीच्या सर्वात मोठया उत्सवास प्रारंभ झाला आहे. भाजप आणि एनडीए या निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहे. सुशासन आणि सेवांचे प्रदान या शिदोरीवर आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान