प्रेमात सगळे काही माफ असते असे म्हणतात. मात्र चक्क खून करण्याचा प्रयत्न झाला तर? होय नाशिकमध्ये अशीच घटना घडली आहे. प्रियकराने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याचा राग प्रेयसीने मनात ठेवला. फक्त राग मनातच ठेवला नाही तर प्रियकराच्या पत्नीच्या अंगावर सर्पमित्राच्या साथीने किंग कोब्रा नाग सोडला. पल्लवी भालेराव आणि सर्पमित्र किरण गांगुर्डे अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे दोघेही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी तिच्या प्रियकराने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यामुळे नाराज झाली होती. तिने किरण गांगुर्डे या सर्पमित्राला गाठले. त्याच्या साथीने ती तिच्या प्रियकराच्या घरी गेली. प्रियकराच्या बायकोला तिने एका खोलीत नेले. तिथे तिच्या अंगावर कोब्रा नाग सोडला. या नागाने पल्ल्वीच्या प्रियकराच्या पत्नीच्या हाता दोनवेळा दंशही केला.

तिच्यावर नाशिकच्या रूग्णालयात उपचार सुरू होते. ही सगळी घटना सप्टेंबर महिन्यात घडली. मात्र या सगळ्या घटनेबाबत मनात प्रचंड भीती बसल्याने आणि उपचार सुरु असल्याने पीडित महिलेने गुरुवारी म्हणजेच २९ मार्चला तक्रार दिली. ज्यानंतर हे सगळे प्रकरण उघडकीस आले. किरण गांगुर्डे आणि पल्लवी भालेराव हे दोघेही फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.