कोकणातील आनंद कुटय़ांना मुहूर्त मिळेना

वर्षभरानंतर प्रकल्पाबाबत कुठलीही हालचाल नाही

वर्षभरानंतर प्रकल्पाबाबत कुठलीही हालचाल नाही

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : कोकणात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर आनंद कुटय़ा (बीचशॅक्स पॉलिसी) उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. कोकणातील आठ किनाऱ्यांवर प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाणार होता. स्थानिकांनी ही कल्पना उचलून धरत शासन निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र वर्ष सरले तरी याबाबत कुठलीच हालचाल झाली नाही.

निळाशार समुद्र, रूपेरी वाळू, विस्तीर्ण किनारे, नारळी-पोफळीच्या गर्द बागा  यामुळे कोकण नेहमीच पर्यटकांनी बहरलेलं असतं. येथील निसर्गसौंदर्याचा आणि ताज्या मासळीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पावले आपोआप कोकणाकडे वळतात. कोकणातील अनेक समुद्रकिनाऱ्यांना मिनीगोवा असं संबोधलं जातं परंतु आता गोव्याच्या धर्तीवर कोकणातील पर्यटनवाढीसाठी समुद्रकिनाऱ्यांवर आनंद कुटय़ा (बीच शॅक्स) प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सुरुवातीला कोकणातील चार जिल्ह्य़ांतील आठ किनाऱ्यांवर हा पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार आहे. यात रायगड जिल्ह्य़ातील वरसोली आणि दिवेआगर या दोन समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे. पण वर्ष सरले तरी याबाबत शासनस्तरावर कुठलीच हालचाल झाल्याचे दिसून येत नाही.

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा पर्यटन विकासाचा मानस बोलून दाखवला. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही याची ग्वाही दिली. पण गेल्या वर्षी जून महिन्यात घेतलेल्या आनंद कुटय़ांच्या निर्णयाबाबत कोकणात शासनस्तरावर कुठलीच हालचाल झाली नसल्याचे दिसून येत आहे. 

महत्त्वाची बाब म्हणजे राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे कोकणवासीयांनी जोरदार स्वागत केले होते. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळेल. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळेल अशी अपेक्षा रायगडमधील पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केली होती. याबाबत कुठलीच हालचाल झाली नसल्याने दिवेआगर आणि वरसोली येथील पर्यटन व्यावसायिकांचा हिरमोड झाला आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे.

रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे या पर्यटन विभागाचा राज्यमंत्री पदाचा कार्यभार आहे. त्यामुळे त्यांनी यात लक्ष घालून आनंद कुटय़ांचा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे.

प्रकल्पासाठी मध्यंतरीच्या काळात पर्यटन विभागाने वरसोली येथे येऊन सर्वेक्षण केले होते. ग्रामपंचायतीकडून लागणारे सर्व सहकार्य देण्याचे आम्ही त्यांना कबूल केले. त्यासाठी लागणारे ठरावही करून आम्ही दिले आहेत. मात्र अजून तरी प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकलेले नाही. हे काम लवकर सुरू व्हावे यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.   

–    मिलिंद कवळे, उपसरपंच, वरसोली

बीच शॅक्स पॉलिसी यायला हवीच पण त्यासोबत समुद्रकिनाऱ्यावर पायाभूत सुविधांचा विकासही व्हायला हवे. चांगले रस्ते, स्वच्छतागृह, पार्किंग सुविधा, जीवरक्षकांची व्यवस्था व्हायला हवी. समुद्रकिनाऱ्यांची शांतता भंग होणार नाही याची पण खबरदारी घ्यायला हवी. तरच कोकणचा पर्यटन विकास होऊ शकेल.

–  संजय यादवराव, कोकण भूमी प्रतिष्ठान

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Goa style beach shack policy coming soon in konkan coast zws

ताज्या बातम्या