रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ला शाखेत तब्बल ५० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी बँकेच्या शाखाधिकारी, शिपाई आणि कॅशियर या तिघांविरुद्ध संगनमत करून विश्वासघात आणि अपहार केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी शिपाई अमोल आत्माराम मोहिते याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ग्राहकांकडून सोने घेऊन त्यावर कर्जवाटपाचे काम या बँकेकडून केले जाते आहे. या कर्जाची परतफेड झाल्यानंतर हे दागिने परत देण्यात येतात.

मात्र, कर्ला शाखेच्या तिजोरीत ठेवलेले ५० लाखांचे सोन्याचे दागिने गायब झाल्याचा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. फिर्यादी सुधीर गिम्हवणेकर यांनी याविषयी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानुसार किरण विठ्ठल बारये (शाखाधिकारी), अमोल आत्माराम मोहिते (शिपाई) आणि ओंकार अरविंद कोळवणकर (कॅशियर) या तिघांनी संगनमत करून सोन्याचा अपहार केल्याचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार १८ फेब्रुवारी २०२५ ते ४ ऑगस्ट २०२५ दरम्यान झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी कर्ला शाखेला भेट देत पंचनामा करुन बँक कर्मचाऱ्यांची स्टेटमेंट्स व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.