गोंदिया : धानाचे कोठार अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात कृषीक्षेत्रात शेतकऱ्यांनी काही नवीन प्रयोग केले आहेत. काही तालुक्यातील शेतकऱ्यांनी धानाबरोबरच मक्याचेही उत्पादन घेतले आहे. परंतु धानावर प्रक्रिया उद्योगाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
१ मे १९९९ रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्हा अस्तित्वात आला. जिल्ह्यातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात भात पिकावर अवलंबून आहे. धान उत्पादन रब्बी आणि खरीप अशा दोन हंगामातून घेतले जाते. वर्ष २०२३-२४ मध्ये २,९५१ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. यातील २,९३९ क्विंटल धान भरडाईकरिता देण्यात आला. यातील लाभधारक शेतकऱ्यांची संख्या ९२,४११ आहे. जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी या तालुक्यातील शेतकरी धान पिकांसह मक्याला प्राधान्य देत आहेत. तसेच पालेभाज्यांचे उत्पादन घेण्याकडेही कल वाढला आहे.
गोंदिया जिल्ह्यातून मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५३), नवनिर्मित कोहमारा-गोंदिया (राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३) बालाघाट-गोंदिया-आमगाव-देवरी (राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४३) हे तीन महामार्ग गेल्यामुळे दळणवळणाच्या सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यात इटियाडोह, नवेगांवबांध, पुजारीटोला, कालीसराड, सिरपूर, चोरखमारा, बोदलकसाआदी मोठी धरणे असून, नवेगांवबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्य ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.
जिल्ह्यात महामार्गांचा विस्तार, रेल्वेद्वारे देशभरात संलग्नता, इंदूर, गोंदिया, हैदराबाद अशी विमान सेवा सुरू आहे. या दळणवळण सुविधांनी जिल्ह्यात सर्व क्षेत्राला उभारी मिळण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्याचे २०२३-२४ या वर्षात दरडोई उत्पन्न १ लाख ६३ हजार ४० रुपये आहे. जिल्ह्यात तेंदूपानाचे संकलन केले जाते. वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण १८९१८ पोती तेंदूपानाचे संकलन करण्यात आले.
मोठे उद्योग आवश्यक
गोंदिया जिल्ह्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्याोगांची संख्या ४६,९६३ इतकी आहे. यातून १ लाख ३८ हजार ६७९ इतकी रोजगार निर्मिती झाली आहे. या वर्षीची उद्याोगातील गुंतवणूक ७५३७८ कोटी रुपयांची होती. तसेच जिल्ह्यात एकूण १८० कारखाने सुरू आहेत. यात २७९०८ कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यात ३४९० कामगार काम करीत आहेत. यामुळे गोंदिया जिल्ह्यात रोजगाराच्या दृष्टीने लहान तसेच मोठ्या उद्याोगांची उभारणी होणे महत्त्वाचे आहे.
जनधन खात्यांत वाढ
प्रधानमंत्री जनधन खात्यांची संख्या गोंदिया जिल्ह्यात वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत ही संख्या जवळपास ४ लाखांवरून ६ लाखांच्या घरात गेली आहे. २०१९ मध्ये जनधन खात्याची संख्या ४,३०,१४१ वरून २०२४ मध्ये ६,६०,९९३ वर पोहोचली.
मुद्रा कर्ज वितरणात घसरण
मुद्रा कर्जाच्या अनुषंगाने २०१९ ते २०२४ या पाच वर्षांत गोंदिया जिल्ह्याची मुद्रा कर्ज वितरणाच्या क्रमवारीमध्ये घसरण झाल्याचे आढळून येते.