Gopichand Padalkar Jayant Patil Statement: भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी असंच एक विधान केलं असून त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वडिलांचं नव घेत त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. त्यांच्या या विधानावरून राजकीय सांस्कृतिकतेवर चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनी गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचा जोरदार समाचार घेतला आहे. दुसरीकडे सत्तेत भाजपासोबत बसलेल्या अजित पवार यांनी पडळकरांच्या विधानावरून भाजपाला अप्रत्यक्ष शब्दांत कानपिचक्या दिल्या आहेत.
जयंत पाटलांबाबत काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
गोपीचंद पडळकरांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षावर हल्लाबोल केला. यावेळी जयंत पाटील यांच्याबाबत बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली. त्यांचा एकेरी उल्लेख करत पडळकर म्हणाले, “जयंत पाटला, तुझ्यासारखी भि** अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची धमक आहे. तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे’.
अजित पवारांच्या भाजपाला कानपिचक्या
पडळकरांच्या या विधानावर विरोधकांकडून संताप व्यक्त होत आहे. पण खुद्द सरकारमधील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असा विधानांवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, या विधानावरून त्यांनी भाजपाला अप्रत्यक्ष शब्दांत कानपिचक्या दिल्या आहेत.
“आमचं महायुतीचं सरकार आहे. भाजपाच्या लोकप्रतिनिधींच्या किंवा त्यांच्या संबंधित व्यक्तींच्या काही चुका असतील, तर भाजपानं त्याची नोंद घेतली पाहिजे. त्यावर भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आमच्या पक्षात असं काही घडलं तर आम्ही नोंद घेतली पाहिजे किंवा शिवसेनेत असं काही घडलं तर एकनाथ शिंदेंनी त्याची नोंद घेतली पाहिजे. पडळकरांच्या विधानाविषयी मला काहीही माहिती नाही. पण मी याच विचारांचा आहे की कुणी कुठल्याही पक्षाचा असला, तरी महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा, संस्कृती आहे. प्रत्येकानं बोलताना, वागताना कुणाला दुखावणारी विधानं करू नये. समाजात सलोखा आणि चांगलं वातावरण राहील असाच प्रयत्न सगळ्यांनी करायला हवा”, असं अजित पवार प्रसारमाध्यमांना म्हणाले.
…तर तिसऱ्या मिनिटाला शरद पवारांचा फोन येईल – जितेंद्र आव्हाड
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर परखड शब्दांत टीका केली आहे. “जोपर्यंत नेतृत्वाचा पाठिंबा नाही तोपर्यंत हे असे कार्यकर्ते बोलतच नाहीत. आम्ही असं चुकून जरी बोललो, तरी शरद पवारांचा तिसऱ्या मिनिटाला फोन येईल की माजला का रे तू? ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी. बोलता तर आम्हालाही येतं. पण आम्ही कधी कुणाच्या आई-बापावरून बोललो नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.