मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याविरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. आज इंदापूर येथे ओबीसी एल्गार सभा झाली. या सभेत गोपीचंद पडळकर यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत असून ओबीसी समाजातील पोरांना दाखल्यासाठी ताटकळत राहावं लागत असल्याचा आरोप केला.
गोपीचंद पडळकर म्हणाले, अंबडमध्ये एकत्रित आलो म्हणून सरकारही तुमच्या बाजूने निर्णय घ्यायला तयार झालं आहे. अजून काही योजनांचे निर्णय यायचे आहेत. मी भुजबळांना विनंती करतो की नागपूरच्या अधिवेशात त्याही सर्व विषयांना न्याय मिळावा असा प्रयत्न आपल्या माध्यमातून झाला पाहिजे. ओबीसीच्या सगळ्या नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे की वज्रमूठ सैल करू नका. राजकारण, जात-पात-धर्म बाजूला ठेवा. सगळे ओबीसी नेते एक व्हा आणि भुजबळांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहा. एखादा नेता इकडे तिकडे गेला तर काही फरक नाही. मी हात जोडून विनंती करतो सर्वांनी ताकदीने उभे राहा.
मराठ्यांना सरसकट दाखले अन् ओबीसींना…
“गावगाड्यातील सर्व लोक एकत्र आले आहेत. आम्हाला अजून जाळायला स्मशानभूमी नाही. जाळायला कोणाच्या स्मशानभूमीत प्रेत नेलं तर तुमच्या स्मशानभूमीत जाळा सांगतात. ज्याच्या नोंदी सापडल्या त्या मराठा समाजातील मुलांना सरसकट दाखले द्यायला सुरूवात केली आहे. पण अजून आमच्या हेडव्याच्या पोराला, तेल्याच्या पोराला, कोळ्या, साळ्या, माळ्याच्या पोराला हातखर, धनगर, रामोजी, मुस्लमान, लिंगायतच्या पोराला अजून दाखले मिळत नाहीत. आमच्या नावावर जमीन नाही, सातबारा नाही. कोणताही कागदपत्र नाही. आम्हाला काही मिळत नाही, अन् इकडे एका बाजूला एका दिवसांत दाखले देताय आणि तिथं चार चार महिने झाले तरी लोक तिथं अर्ज करत आहेत तर त्यांच्याकडे वेगवेगळे पुराव मागत आहेत. हा दुजाभाव कशासाठी? हा दुजाभाव का करताय? म्हणून गावातल्या सर्व ओबीसींनी एकत्र या”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
हेही वाचा >> “तर लाठीचार्जनंतर मनोज जरांगेंना सहानुभूती..”, देवेंद्र फडणवीसांचं उत्तर वाचून दाखवत भुजबळांचा आरोप
भुजबळांच्या केसालाही धक्का लागणार नाही
“अंबडची सभा झाल्यानंतर भुजबळांना अनेक धमक्या आल्या. पण भुजबळ साहेबांना कोणी काही करणार नाही. त्यांच्या डोक्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. महाराष्ट्रातील पाच कोटी धनगर समाजाच्या वतीने भुजबळ साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, हा शब्द सर्वंच्या वतीने देतो. आता पाडापाडीची भाषा सुरू झाली. पाडापाडीच्या भाषेवर हेच सांगायचं की, हुकुमत तो वो करते है जिनका लोगोंके दिले मैं राज होता है, वरना मुर्गों के सर पे भी ताज होता है”, असा शेरही त्यांनी ऐकवला.
“गावातले छोटे छोटे समाज काय काय क्रांती करू शकतात बघतात. तुम्ही हिणवता, गावात नाभिक, गुरव, लोहार समाजाची घरे किती, सोनार, सुताराची घरे किती. आज तुम्ही गावात कुणबीचा दाखला दिला तर सरपंचाचं आरक्षण गेलं”, असंही ते म्हणाले. म्हणून ओबीसी समाजाने एक व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
हेही वाचा >> गोपीचंद पडाळकर यांची विधानसभा आमदारकीची तयारी सुरू
ओबीसी समाजाला दिली शपथ
“मी अशी शपथ घेतो की, आम्ही ओबीसी भटके, विमुक्त आदिवासी दलित लोक संविधान साक्षी ठेवून शपथ घेतो की उपेक्षितांच्या न्याय हक्कांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करू. महाराष्ट्राला समता, समानता बंधुतेच्या वाटेवर पुढे नेऊ”, अशी शपथही त्यांनी ओबीसी समाजाला दिली.