दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ परळीत उभारण्यात आलेल्या गोपीनाथगड या स्मारकाचे अनावरण भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते, मंत्री तसेच मित्रपक्षाचे नेतेही या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित होतो.
कमलाकृती आकार, २२ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरातील १८ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा भव्य कमलाकृती आकाराचा ‘गोपीनाथगड’ साकारण्यात आला आहे. आकर्षक शिल्पकलेचे प्रवेशद्वार, गोपीनाथ मुंडे यांचा २२ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा, प्रशस्त ध्यानमंदिर, समाधीस्थळ, थीम पार्क आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र या स्मारकात उभारण्यात आले आहे. मुंडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या राजकीय वारसदार ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचे संघर्षमय जीवन नव्या पिढीला प्रेरणादायी ठरावे या उद्देशाने भव्य स्मारक उभारण्याचे ठरविले. मुंडे यांचा राजकीय प्रवास, शेतकरी कुटुंबातील मुलगा ते केंद्रीय मंत्री आणि कायम संषर्घयात्री असाच राहिला. भगवानगड हा धार्मिक, तर गोपीनाथगड राजकीय शक्तीचा गड मानला जाणार आहे. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. पुण्याच्या गार्डीयन प्रा. लि. कंपनीने या गडाची उभारणी केली. कोल्हापूर येथील कलाकारांनी तयार केलेला २२ फूट उंचीचा मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा, तर कमळाच्या फुलाच्या आकाराचे ध्यान मंदिर हे आकर्षण ठरले आहे. स्मारकात समाधीस्थळ तसेच केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopinath fort inauguration ceremony in parli
First published on: 12-12-2015 at 14:33 IST