राहाता : कधी दुष्काळ तर कधी गारपीट होते आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढलं की, बाजारभाव पडतात. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे.
जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे निर्णय घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. त्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शासनाला सादर होईल. सहकारी बँकांचे आर्थिक वर्ष संपायच्या आत म्हणजेच, जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा घेतला जाईल अशी माहिती देत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीला दुजोरा दिला.
कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १३ व्या स्मृत्यर्थ काळे सहकारी साखर कारखान्याने कोळपेवाडी (कोपरगाव) येथे आयोजित केलेल्या ‘कर्मवीर कृषी महोत्सव-२०२५’ च्या उदघाटनप्रसंगी मंत्री भरणे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक कानडे, द्राक्ष बागायतदार राज्य संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे तसेच पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
मंत्री भरणे म्हणाले, शेतकरी आजही जुन्या पद्धतीने शेती करतो, परंतु आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन वाढीचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. कर्मवीर काळे कारखान्याचा आदर्श इतर कारखान्यांनी घ्यावा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. आमदार आशुतोष काळे म्हणाले, शेतकर्यांनी केलेल्या मागणीची दखल घेवून कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.
एआय तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये सुरु झाला असून त्याला कृषी क्षेत्रही अपवाद नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख होवून ऊस उत्पादन वाढीसाठी, दुग्ध व्यवसायासाठी अशा तंत्रज्ञानाचा उपयोग होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक कर्मवीर काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी केले. आभार उपाध्यक्ष नारायण मांजरे यांनी मानले तर सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले.
जिल्हा कृषी महोत्सव कोपरगावला
आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांना शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ होवून, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी कर्मवीर कृषी महोत्सवाचे सुंदर नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना अधिकचा फायदा व्हावा यासाठी यापेक्षा मोठे नियोजन करण्याची जबाबदारी मला आमदार आशुतोष यांच्यावर द्यायची आहे. पुढील वर्षी होणारे जिल्ह्याचे कृषी प्रदर्शन कोपरगावला होईल, असे कृषीमंत्री भरणे यांनी जाहीर केले.
