लातूर – विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अडचणीचा गुंता वरचेवर वाढतोच आहे . महाविद्यालयाकडे कागदोपत्री ४२ एकर जागा असली तरी प्रत्यक्षात नवीन इमारतीच्या बांधकामासाठी मोकळी जागा नाही त्यामुळे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे . विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लातूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले २००३ साली पहिली बॅच बाहेर पडली. दीडशे जागांची क्षमता या महाविद्यालयाला मंजूर झालेली होती. विलासराव देशमुख यांनी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला मात्र रेल्वे कडून मिळणाऱ्या जागेसाठी अडचणी वाढत राहिल्या.

२०१९ साली केंद्र सरकारने देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांना ५० जागा आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी देऊ केल्या होत्या त्याच कालावधीत लातूरला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची तपासणी आली व त्या पथकाने अनेक त्रुटी काढून दीडशे जागांच्या पैकी ५० जागा कमी करून केवळ शंभर जागा ठेवल्या. ५० अतिरिक्त जागा मिळायच्या होत्या त्या तर मिळाल्याचं नाहीत. २०२० साली महाविद्यालयाने काही प्रमाणात त्रुटी दूर केल्यानंतर १०० च्या ऐवजी दीडशे जागा उपलब्ध झाल्या मात्र ज्या पन्नास वाढीव जागा मिळायल्या हव्या होत्या त्या मिळाल्याच नाहीत .आता महाविद्यालयात प्रत्येक वर्गात विद्यार्थी बसण्याची क्षमता दीडशे इतकीच आहे जर जागा वाढवून मिळाल्या तर वर्गखोल्याची क्षमता वाढवायची कशी हा प्रश्न आहे.

वसतिगृहाची इमारत बांधायची कुठे हा प्रश्न आहे. महाविद्यालयाच्या परिसरात पूर्वी सामान्य रुग्णालय होते जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवश्यकतेनुसार बांधकाम करण्यात आले होते ते बांधकाम आता पाडता येत नाही त्यामुळे नवीन इमारती उभ्या करणे अवघड आहे. रेल्वे विभागाकडून पाठपुरावा करून साडेपाच एकर जागा महाविद्यालयाच्या नावावर करून घेतली आहे मात्र रेल्वे विभागाने न्यायालयात खटला दाखल करून स्थगिती मिळवली आहे त्यामुळे नवीन इमारत बांधता येत नाही अन्य सुविधा करता येत नाहीत अशा अडचणीचा पाढा वाढतोच आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर उदय मोहिते यांना या संबंधात विचारले असता रेल्वे विभागाने हे प्रकरण न्यायालयात नेलेले असल्यामुळे आमच्या नावावर जमीन असूनही त्या ठिकाणी बांधकाम करता येत नाही. न्यायालयाचा निकाल लागण्यास किती कालावधी लागेल, माहिती नाही त्यामुळे आहे त्या स्थितीत महाविद्यालय चालवावे लागते आहे. महाविद्यालयातील अनेक विभागात कर्मचारी, प्राध्यापक यांची संख्या कमी आहे केंद्र सरकारकडे याचा पाठपुरावा केला जातो आहे त्यात यश आले तर महाविद्यालयाच्या अडचणी दूर होतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण झाले मात्र त्यानावाला साजेसे सुसज्ज महाविद्यालय कधी अस्तित्वात येणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.