सांगली : शेतकरी कर्जमुक्त करण्याची जबाबदारी सरकारची आहे. ही जबाबदारी जोपर्यंत सरकार पार पाडत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा माजी खासदार संजयकाका पाटील यांनी मंगळवारी तासगावमध्ये दिला. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप की, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात कार्यरत राहणार याची उत्सुकता असताना माजी खासदार पाटील यांनी मंगळवारी चक्काजाम आंदोलनाच्या निमित्ताने सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्यास प्राधान्य दिले.

निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरण यामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची सरकारची जबाबदारी आहे. बळीराजाच्या, सामान्य जनतेच्या बाजूने बोलणारा आवाज क्षीण झाला आहे. या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

शेतकरी कर्जमाफी या प्रमुख मुद्द्यासह शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी तासगाव येथे आयोजित चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आपल्या शेळ्या मेंढ्या व पाळीव जनावरासह आलेल्या शेतकऱ्यांनी बसस्थानक चौकात ठिय्या मारला. बैलगाडी, ट्रॅक्टर व जनावरांसह शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. यामुळे तासगावमधून बाहेर जाणारी व येणारी वाहतूक ठप्प झाली होती. विटा, भिवघाट, भिलवडी, सांगली, मणेराजुरी या मार्गांवर वाहनांच्या चार तासाहून अधिक काळ रांगा लागल्या होत्या.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना बाहेर काढायचे असेल तर सरकारने कर्जमाफी करणे हाच त्यावरचा एक मात्र उपाय आहे. आणि त्यासाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून नव्हे, तर त्याच्यापुढे एक पाऊल राहून लढण्याची भूमिका माजी खासदार पाटील यांनी जाहीर केली. यावेळी युवा नेते प्रभाकर पाटील यांनी शेती परवडत नसताना करावी लागत असल्याचे सांगत शेतकरी पोराला पोरगीही मिळत नसल्याची वेदना व्यक्त केली. निसर्ग कधी बदलतो हेच कळेना झाले आहे. यामुळे कर्ज काढून पीक घ्यायचे तर परतफेड करण्यासाठी उत्पन्नाची शाश्वती नाही. यामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी सरकारनेच पुढाकार घ्यायला हवा असेही त्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेऊन माजी खासदार पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा केली होती. या बैठकीमध्ये त्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून साथ केली, त्या कार्यकर्त्यांसाठी आता आपण कोणत्याही चिन्हाचा, पक्षाचा विचार न करता मैदानात उतरणार असल्याचे सांगितले होते.