अमरावती : शिक्षणाचे वैश्वीकरण होत असताना विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. संपूर्ण जगात परिवर्तन घडविण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता आपल्या कौशल्याचा वापर करून रोजगाराच्या नवीन संधी शोधल्या पाहिजेत, आत्मनिर्भर बनले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी येथे केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३८ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. राज्यपाल या सोहळयात ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, संपूर्ण जगातच बेरोजगारी, महागाई हे प्रश्न आहेत. पण, त्यातून मार्ग काढून परिवर्तन करण्याची शक्ती युवकांमध्ये आहे. शिक्षण घेतल्यानंतर आपण सहजपणे समाजाने मला काय दिले, असा प्रश्न विचारतो, पण त्यापेक्षा आपण समाजाला काय दिले, याचा विचार करणे गरजेचे आहे. राज्यातील अनेक विद्यापीठांना संत-महापुरूषांची नावे दिली आहेत, कारण त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळत असते. या संतांनी समाजासाठी त्यागभावनेतून जे काही केले, त्याचा आदर्श इतरांनी घ्यावा, हा विचार त्यामागे आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्व सांगताना राज्यपाल म्हणाले, नव्या शिक्षण व्यवस्थेत आपण कोणत्याही शाखेचे ज्ञान मिळवू शकणार आहोत. अमेरिकेसारखा देशही त्यांच्या देशातील महाविद्यालयांमधून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यास तयार आहे. अनेक पीएचडी झालेले युवक, कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षित पदवीधर स्वत: शेती करून कृषी विकासात आपले योगदान देत आहेत. हॉर्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन भारतात परतलेली हरियाणातील एक युवती गावची सरपंच बनली आणि तिने ग्रामविकासासाठी आपले योगदान दिले. अशी अनेक उदाहरणे आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. भारतातून अनेक विद्यार्थी परदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी जातात, पण तेथून पदवी घेतल्यानंतर किती पदवीधर देशात परततात हा संशोधनाचा विषय आहे. परेदशात उच्च शिक्षण घेऊन भारतात परत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ १५ ते २० टक्के आहे. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या देशाला, आपल्या राज्याला आपल्या गावाला विसरू नये, आपल्या देशाप्रती आपलेही उत्तरदायित्व आहे, हे या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचा वापर देशाच्या विकासासाठी करतानाच इतरांनाही ती कौशल्ये शिकवण्यासाठी योगदान दिले पाहिजेत.

कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी विद्यापीठाच्या विकासात्मक बाबींची माहिती यावेळी दिली. गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दीक्षांत समारंभात ५५ हजार १९ विद्यार्थ्यांना पदवी तर २१० संशोधकांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.

‘पुष्पा’ बनण्याची गरज नाही

आज विद्यार्थ्यांसमोर चित्रपटांतील नायकांचे आदर्श आहेत, नुकताच एक ‘पुष्पा’ हा युवकांचा आदर्श बनला. पण समाजाला दिशा देणाऱ्या महान व्यक्तिमत्वांपैकी किती महापुरूषांची ओळख नव्या पिढीला आहे, हा प्रश्न पडतो, असा टोला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लगावला.