महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपल्या वक्तव्यांमुळे किंवा कृतींमुळे चर्चेत येत असतात. त्यांना हटवण्यासाठी महाविकास आघाडीने मोर्चाही काढला होता. तसंच हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही महापुरूषांच्या अपमानावरून आणि राज्यपाल या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून होणाऱ्या उल्लेखांवरून राज्य सरकारला खडे बोल सुनावले. अशात आता राज्यपाल पुन्हा चर्चेत आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी जी शिवप्रतिमा योगी आदित्यनाथ यांना देण्यात आली त्यावरून अमोल मिटकरींनी टीका केली आहे.

काय म्हटलं आहे अमोल मिटकरींनी?

राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतंय, आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही, तुम्ही कितीही आंदोलनं करा . बघा हा फोटो बरच काही दर्शवतोय.. पायात पायताण घालून जर “शिवप्रतीमा” देत असाल आणि बाकी सर्व मुकसंमतीदर्शवित असतील तर या प्रकाराला काय म्हणावे?

या फोटोत नेमकं काय आहे?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट देताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आहेत. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि योगी आदित्यनाथ यांनी चपला घातल्याचं दिसतं आहे. राज्यपालांनी याआधी केलेली वक्तव्यं चर्चेत आहेतच अशात आता हा नवा फोटोही वाद निर्माण करणारा ठरू शकतो.

नोव्हेंबर महिन्यात काय म्हटलं होतं राज्यपालांनी?

महाराष्ट्राचे राज्यपाल औरंगाबाद येथील विद्यापीठात एका कार्यक्रमात उपस्थित होते. तिथे त्यांनी भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श होते, आत्ताच्या काळातले आदर्श नितीन गडकरी आहेत असं म्हटलं होतं. त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता.

छत्रपती शिवरायांबाबत याआधीही वादग्रस्त वक्तव्य

गुरुची महती पटवून देण्याच्या नादात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल आणि समर्थ रामदारांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण विचारेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता? राज्यपाल भगत सिंह कोश्यारींच्या या वक्तव्यावरूनही चांगलाच वाद निर्माण झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पायात चपला असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शिवप्रतिमा भेट देताना दिसत आहेत. हा फोटोच अमोल मिटकरींनी ट्विट केला आहे. त्यावरून आता नवा वाद निर्माण होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.