Bombay High Court Grants Bail To Prime Accused In Govind Pansare Murder Case : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर बेंचने मंगळवारी दिवंगत कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तिन्ही मुख्य आरोपी – वीरेंद्र तावडे, शरद काळसकर आणि अमोल काळे यांना जामीन मंजूर केला आहे. एकल न्यायाधीश शिवकुमार डिगे यांनी तोंडी हा जामीन देण्याचा निर्णय दिला. या आदेशाची सविस्तर प्रत अद्याप उपलब्ध झालेली नाही. यासंबंधीचे वृत्त ‘लाईव्ह लॉ’ने दिले आहे.

फिर्यादी पक्षाने मांडलेल्या प्रकरणानुासर, तावडे हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे, ज्याने पानसरे यांच्या हत्येचा कट रचला होता. इतर दोन आरोपी शरद कळसकर आणि अमोल काळे यांच्यावरही तावडेबरोबर मिळून कट रचल्याचा आणि पानसरे व इतर विचारवंतांविरुद्ध तरुणांना भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळ्या झाडण्यात आल्या. कोल्हापूर येथे गोविंग पानसरे हे त्यांची पत्नी उमा यांच्याबरोबर सकाळी फिरून परतत असताना त्यांच्या घराजवळ हा हल्ला करण्यात आला होता. गोळीबारात झालेल्या जखमांमुळे पानसरे यांचा २० फेब्रुवारी २०१५ रोजी मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी बचावल्या.

दोघे अद्यापही फरार

या प्रकरणाचा तपास सुरुवातीला कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याकडून करण्यात आला त्यानंतर तो गुन्हे अन्वेषन विभागाच्या (CID) विशेष तपास पथका (SIT) कडे सोपवण्यात आला. अखेर २०२२ साली तो एटीएसकडे देण्यात आले.

या प्रकरणाच्या तपासात १२ आरोपींची नावे समोर आली. यापैकी १० आरोपींना एसआयटीने अटक केली आणि यापैकी दोनस विनय पवार आणि सारंग अकोलकर हे अद्यापही कथितपणे फरार असल्याचे सांगितले जाते.