कृत्रिम पाऊस पडणार की, नाही याविषयीही गेल्या काही दिवसांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. पण,  गेल्या दीड महिन्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी उपयुक्त असलेले विमान शनिवारी औरंगाबादेत दाखल झाले. येत्या आठवड्यात जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे.
प्रयोगासाठी लागणारे विमान बंगळूरहून शनिवारी दुपारी चिकलठाणा विमानतळावर आले आहे. या विमानातही लहान रडार असल्याने सोमवारी कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचणी घेता येईल, असे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले. अमेरिकेतून येणारी डॉप्लर रडार यंत्रणा सोमवारपर्यंत मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईहून ही यंत्रणा मंगळवारपर्यंत औरंगाबादेत येईल. त्यानंतर लगेचच ढगांची मोजणी आणि नंतर प्रत्यक्ष कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे विभागीय आयुक्तालयातील अधिकार्‍यांनी सांगितले.
मराठवाडय़ातील बीड, उस्मानाबाद, लातूर व परभणी या चार जिल्ह्यातील दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होऊ लागली आहे. चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. ऊस कापून जनावरांना खाऊ घातला जात आहे. चाऱ्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. गतिमान वैरण विकास कार्यक्रमातून तब्बल १० कोटींची तरतूद असली, तरी पाऊसच नसल्याने चारा तरी कसा पिकवायचा, असा पेच आहे. त्यामुळे सर्वाचे लक्ष कृत्रिम पाऊस कधी पाडणार, याकडे लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt mulls use of cloud seeding technology for artificial rains
First published on: 02-08-2015 at 03:29 IST