सांगली : जयंत पाटील यांच्या डोक्यात काय सुरू आहे याचा लवलेशही चेहऱ्यावर आढळत नाही. यामुळे त्यांच्या नाराजीबाबत एखाद्या माध्यम प्रतिनिधीलाच समजू शकेल, अशी मिश्किल प्रतिक्रीया पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली.
आज सांगली दौऱ्यावेळी आल्यानंतर त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाची जिल्हा बँकेचे उपाध्यक्षा जयश्री पाटील, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासमवेत पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना आमदार पाटील हे नाराज आहेत का, असे विचारले असता ते म्हणाले, त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे याचा थांगपत्ता चेहऱ्यावरील हावभावावरून लावता येत नाही. एखाद्या पत्रकारांशी ते बोलत असतील तर त्याचे नाव मला सांगा मी त्या पत्रकाराच्या कानात विचारतो, असे सांगून विषय टाळला.
महापालिका निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असा अंदाज व्यक्त करत असताना त्यांनी असेही सांगितले, मी निवडणूक आयोग नाही त्यामुळे मी बोलतोय ही शक्यताच आहे. एकदा का निवडणुका जाहीर झाल्या की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपूर्ण निवडणुका होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. यामुळे विकास कामाचा प्रारंभ सप्टेंबरपर्यंत करता येतील.
विधिमंडळात झालेल्या गदारोळाबाबत विचारले असता अधिवेशन काळात कुणाला प्रवेश द्यायचा, किती जणांना प्रवेश द्यायचा याची नियमावली तयार करावी लागेल. सध्या विधानसभा अध्यक्षांनी आमदार व त्यांचा अधिकृत स्वीय सहायक अशा दोघांनाच प्रवेश देण्यात येईल, असे सांगितले असले तरी हा नियम कठोर आहे. अपवादात्मक स्थितीत काय करायचे असा प्रश्न निर्माण होतो. यामुळे मी संसदीय कामकाजमंत्री असल्याने याबाबत जुन्या नियमांचे पुनर्विलोकन करावे लागेल असेही ते म्हणाले.
पुढील निवडणुका मतपत्रिकेवर व्हाव्यात, अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली आहे, याबाबत विचारले असता ते म्हणाले, ज्यावेळी अपयश येते त्यावेळी त्यांना मतदान यंत्र नको असे वाटते. आम्ही कोणत्याही पध्दतीने निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहोत. आणि जिंकणारही आहोत असेही मंत्री पाटील म्हणाले.