scorecardresearch

नगरसाठी वेळ देणारा पालकमंत्री द्या; जिल्हाध्यक्षांचे खा. सुळे यांना साकडे

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज, मंगळवारी नगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी संवाद मेळाव्यात पक्षाच्या उपेक्षित आघाडय़ांकडून संघटनेच्या कार्यपद्धतीविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्यात आली तर पक्षाच्या व्यासपीठावरून प्रथमच पालकमंत्री बदलाची मागणी करण्यात आली.

NCP Supriya Sule reaction to Nawab Malik ED inquiry
(संग्रहित छायचित्र)

‘राष्ट्रवादी’च्या ‘उपेक्षित’ सेलची जाहीर नाराजी; युवक जिल्हाध्यक्ष बदलणार?

नगर : खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज, मंगळवारी नगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी संवाद मेळाव्यात पक्षाच्या उपेक्षित आघाडय़ांकडून संघटनेच्या कार्यपद्धतीविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्यात आली तर पक्षाच्या व्यासपीठावरून प्रथमच पालकमंत्री बदलाची मागणी करण्यात आली. ‘नगरला वेळ देणारे पालकमंत्री द्या’ अशी मागणीच जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली. मात्र, त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भूमिका घेतील, असे पत्रकारांना सांगत खासदार सुळे यांनी विषय टोलावला.

जिल्हा संघटनेत बदलाचे वारे वाहणार असल्याचे सूतोवाचही या मेळाव्यातून करण्यात आले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना नगरचे पालकमंत्रिपद नकोसे झाल्याचे त्यांनीच यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, त्याला पक्षाकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. पक्षाच्या व्यासपीठावर याबद्दल आत्तापर्यंत चर्चा झाली नव्हती. जिल्हाध्यक्ष फाळके यांनी, मुश्रीफ कोल्हापूरचे असल्यामुळे त्यांना जिल्ह्यासाठी वेळ देता येत नाही, ते वेळ देत नसल्याची कार्यकर्त्यांचीही मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्याला वेळ देणारा पालकमंत्री द्या, असे साकडे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना घातले.

पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड जिल्ह्यात फिरण्यास कमी पडत आहेत, अशी तक्रार फाळके यांनी केली. मात्र, त्यांचे पती राजेंद्र गुंड हेच त्यांना मोकळीक देत नाहीत, अन्यथा महिला संघटना वाढेल असा चिमटाही त्यांनी काढला. ‘युवक’चे जिल्हाध्यक्ष कपिल पाटील व संजय लोळगे आता ‘युवक’ राहिले नाहीत, याकडे लक्ष वेधत त्यांच्या बदलांचे संकेतही फाळके यांनी दिले. पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे यांनी तर पक्षाच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. आम्ही दुर्लक्षित आहोत, आमचा पक्षांतर्गत संघर्ष अद्यापही संपलेला नाही, आमची दखल कोणी घेत नाही, असे ते म्हणाले. त्यावर सुळे यांनी दखल घेत नाही म्हणजे काय, असा प्रश्न केला. पक्षाच्या, संघटनेच्या पातळीवर आमची कोणी दखल घेत नाही, असे उत्तर ससाणे यांनी त्यावर दिले.  त्यांच्या या भूमिकेला पक्षाच्या भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष मलू शिंदे यांनी जाहीरपणे पाठिंबा व्यक्त केला.

शिंदे म्हणाले, की पक्षाने धनदांडग्यांकडे लक्ष देण्यापेक्षा उपेक्षित सेलचे कार्यकर्ते अन्नपाण्याशिवाय पक्षासाठी लढत आहेत, या पदाधिकारी संवाद मेळाव्यातून आमच्या भावना पवार साहेबांपर्यंत जाव्यात. तरच या मेळाव्यांना अर्थ राहील. कारण निवडणुका संपल्या की आम्ही पुन्हा दुर्लक्षित होतो. मात्र खासदार सुळे यांनी आपल्या भाषणात या सर्व टीकाटिपणीवर कोणतेही भाष्य न करता ती बेदखल ठरवली. 

आणखी एका मंत्रिपदाची मागणी

जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद द्या, अशी मागणीच जिल्हाध्यक्ष फाळके यांनी केली. युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांनी आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद देण्याची मागणी केली. अकोल्यातील महिला तालुकाध्यक्षांकडूनही आमदार डॉ. किरण लहामटे यांना पद देण्याची मागणी करण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Guardian minister town district president public dissatisfaction neglected cell nationalist youth district president ysh

ताज्या बातम्या