महात्मा गांधींविषयी हिंदुत्ववाद्यांना असणारा संताप हा द्वेषभावनेतून निर्माण झाला. महात्माजींनी मुस्लिमांचा अनुनय कधीच केला नव्हता, असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रा.सुरेश द्वादशीवार यांनी सेवाग्राम आश्रमात आयोजित शिबिरात व्यक्त केले.
आम्ही सारे या फाउंडेशनतर्फे ‘गांधींच्या कर्मभूमीत गांधी समजून घेतांना’, या विषयावरील शिबिरात प्रा.द्वादशीवार यांनी ‘गांधी नावाचं गारूड’ या विषयावर विचार व्यक्त केले.
महात्माजींनी जगातील सर्वात मोठय़ा लोकसंघर्षांचे नेतृत्व केले होते, असे सांगून ते म्हणाले की, शब्दांच्या मागे आयुष्याचा विचार असणाऱ्या व्यक्तींच्या शब्दाला मंत्रशक्तीचे सामथ्र्य येते. गांधींच्या शब्दात असेच सामथ्र्य होते. त्यांच्या आयुष्यात संघर्षांखेरीज काहीच नव्हते. ज्या बाबतीत हितसंबंध दुखावतात, तेथे संताप समजण्यासारखा असतो. गांधीजींनी मुस्लिमांचा अनुनय केला नसल्याने हिंदुत्वाचे हितसंबंध दुखावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
राज्यभरातून उपस्थित शिबिरार्थीना संबोधित करतांना महात्माजींचे पणतू तुषार गांधी म्हणाले की, फाळणीच्या मुद्यावरून गांधीजींना बदनाम केले जाते. त्यांच्या हत्येचे आठ वेळा प्रयत्न झाले. कारण, गांधीजींनी या देशातील धर्मवाद्यांचा खरा चेहरा पुढे आणण्याचे काम आयुष्यभर के ले. त्यामुळेच कट्टर हिंदूवाद्यांनी त्यांची हत्या केली. सामाजिक विषमता दूर करतांनाच महात्माजींना हिंदूत्वाचा चेहरा या देशाला द्यायचा नव्हता. या देशाच्या अखंडतेसाठीच त्यांची सर्व ते प्रयत्न केले, पण काहींना ते रुचले नाही. आजही भारताला गांधीविचारांची नितांत गरज असून धर्मनिरपेक्षतेचा विचार जिवंत ठेवण्याची गरज आहे.
ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे यांचेही भाषण झाले. ते म्हणाले की, जोपर्यंत सत्य आणि चांगुलपणाला मरण नाही तोपर्यंत गांधी मरणार नाही. गांधी हे मजबुरीचे नव्हे, तर सामर्थ्यांचे प्रतीक होय. त्यांची हत्या करणाऱ्याला देवत्व दिले तरी महात्माजींचे महत्त्व कमी होणार नाही. आठ वेळा गांधीजींची हत्या करण्याचे प्रयत्न हे वेगवेगळ्या महापुरुषांच्या खांद्यावर बंदूक ठेवून करण्यात आले. आज त्यांचे विचार मारण्याचे प्रयत्न सुरूच आहे, पण गांधी अजरामर आहेत. आयोजक संस्थेचे अविनाश दुधे यांनी प्रारंभी भूमिका मांडली. साहित्यिक दत्ता भगत, शेषराव मोरे, आशुतोष शेवाळकर व अन्य मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.