Harshavardhan Patil on Leaving BJP: २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपामध्ये होणार्‍या मेगाभरतीची जोरदार चर्चा होती. हर्षवर्धन पाटील यांनी ११ सप्टेंबर रोजी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला इंदापुरात मोठा धक्का बसला. त्यानंतर बरोबर दोन वर्षांनी १३ ऑक्टोबर २०२१ला हर्षवर्धन पाटील म्हणाले, “भाजपात आल्यापासून आता शांत झोप लागते”… आता बरोबर तीन वर्षांनी आणि पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांच्याच आधी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची वाट धरली आहे. ‘आता झोप लागते का?’ असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारल्यावर त्यांचं उत्तर होतं ‘नो कमेंट्स’!

जवळपास दीड महिन्यापासून प्रत्यक्ष चर्चा आणि त्याआधी अप्रत्यक्ष घडलेल्या घडामोडी या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील लवकरच भाजपातून बाहेर पडतील असं सांगितलं जात होतं. खुद्द भाजपाच्या नेत्यांकडून पाटील यांनी तसं काही सांगितलं नसल्याचं धोरण अगदी काल-परवापर्यंत कायम ठेवलं नसलं, तरी याबाबत आपण देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून त्यानंतर निर्णय घेतल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. त्यामुळे त्यांच्यात आणि पक्षाच्या राज्यातील नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

‘आता झोप लागते’..का म्हणाले होते पाटील असं?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांआधी काही प्रमाणात व त्या निवडणुकांनंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर भाजपामध्ये इनकमिंग होत असल्याचं दिसून आलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर प्रभावी स्थानिक अपक्ष अशा अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. पण त्याचवेळी समांतरपणे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर तपास यंत्रणांच्या धाडी, कारवाया चालू होत्या. याच कारवायांची भीती घालून भाजपा विरोधी पक्षांमधील नेत्यांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे असे आरोपही तेव्हा विरोधकांनी केले. या नेत्यांमध्ये हर्षवर्धन पाटील यांचंही नाव घेतलं जात होतं.

विधानसभा निवडणुका झाल्यानंतरही तपास यंत्रणांच्या कारवाया चालूच होत्या. या पार्श्वभूमीवर २०२१ ला एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या भाषणादरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या विधानामुळे भाजपाकडून तपासयंत्रणांचा विरोधकांचा विरोध मोडून काढण्यासाठी वापर करते असे दावे विरोधकांकडून केले जाऊ लागले. विशेष म्हणजे तेव्हा व्यासपीठावर भाजपाचे अनेक नेते व पदाधिकारीही उपस्थित होते ज्यांनी पाटील यांच्या विधानाला हसून दादही दिली होती!

वाचा तेव्हा काय म्हणाले होते हर्षवर्धन पाटील: “भाजपामध्ये आलो, आता चौकशी वगैरे काही नाही, शांत झोप लागते”

“इथे मला विचारणा झाली की तुम्ही भाजपामध्ये का गेलात? त्यावर मी त्यांना म्हटलं ते तुमच्या नेत्यालाच विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपामध्ये का गेले. पण मी सांगतो, इथे मस्त निवांत आहे. भाजपामध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटतंय”, असं हर्षवर्धन पाटील तेव्हा भाषणात म्हणाले होते.

“नो कॉमेंट्स!”

पाच वर्षांपूर्वी निवडणुकांच्या आधी पाटील यांनी मतदारसंघाची कामं व नागरिकांसाठीच्या योजनांचा हवाला देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. पण गेल्या काही महिन्यांपासून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. शिवाय तीन पक्ष सत्ताधारी गटात असल्यामुळे तिथे इच्छुकांची संख्याही तिप्पट झाली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता वाटू लागली होता. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी आपले पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र, यावेळी पत्रकार परिषदेत त्यांच्याच ‘झोप चांगली लागते’ विधानाबाबत विचारणा केली असता त्यावर त्यांनी फक्त ‘नो कमेंट्स’ म्हणत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

विश्लेषण: हर्षवर्धन पाटील यांचा नाराजीतून मोठा निर्णय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हर्षवर्धन पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी हे विधान केल्यानंतर तेव्हाही त्यावर बरीच चर्चा झाली होती. आता ते भाजपातून बाहेर पडल्यानंतरही त्या विधानाचीच चर्चा पाहायला मिळत आहे.