पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. बार्शी, माढा, माळशिरस, पंढरपूर, अक्कलकोट या ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी नदी नाले, ओढे भरून वाहू लागल्याने पाणी शेतात, रस्त्यावरून वाहत आहे. यामध्ये माढा तालुक्याला पुराचे संकट आहे. या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागात यंदा जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तेथील पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा प्रश्न सुटला. मात्र, गेल्या आठ दिवसांत सतत पडणाऱ्या पावसाने शेतात पाणी साचल्याने हाताशी आलेले पीक पाण्यात वाहून गेले. बार्शी तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर माढा तालुक्यात देखील एकीकडे जोरदार पाऊस तर दुसरीकडे लगतच्या अहिल्यानगर, धाराशिव, पुणे जिल्ह्यातील धरणाचे पाणी सीना नदीत सोडल्याने या तालुक्याला आता पुराचे संकट आले आहे. अक्कलकोट तालुक्याला पुन्हा पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच शेतात पाणी साचले आहे. आता पाऊस थांबून कडक ऊन पडले तर शेतकऱ्यांना शेतात काम करता येणार आहे, अशी परिस्थिती झाली आहे. माळशिरस तालुक्यात देखील दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने अकलूज-सांगोला रस्ता काही वेळासाठी बंद झाला होता. या रस्त्यावरून पाणी वाहत होते. पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

पंढरपूरलाही झोडपले

पंढरपूर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले. सांगोला तालुक्यातील कटफळ येथून उगम पावणाऱ्या कासाळ ओढ्याला पूर आला आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नागरी वस्तीसह शेतीपिकात पाणी शिरले आहे. महूद, आहीम, गारदी, पळशी, उपरी आदी गावांतील शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे. तर शहरात अनेक सखल भागात पाणी साचले आहे. लाखो रुपये खर्चून उपनगरात नव्याने डांबरी रस्ते करण्यात आले आहेत. या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले तर वाहत्या पाण्याने खड्डे पडल्याचे चित्र आहे. आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पावसाने नुकसान झालेल्या गावांना भेटी दिल्या. पंचनामे लवकर करावे अशा सूचना आमदार आवताडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.